Join us  

CoronaVirus News : मुंबईत दोन आठवड्यांत कोरोना आटोक्यात, आयआयटीमुंबईचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 4:38 AM

जास्तीत जास्त लोकांची तपासणी, त्वरित निदान, तत्काळ उपचार आणि चेसिंग द व्हायरस ही मोहीम मुंबईत प्रभावी ठरली. ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रसार कधीपर्यंत नियंत्रणात येईल, असे वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. याबाबत आयआयटी मुंबईचे प्राध्यापक भास्करन रमण यांनी नुकताच सादर केलेला अभ्यास अहवाल मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागेल, मात्र मुंबईत पुढील दोन आठवड्यांत म्हणजे जुलैअखेरीस कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी या अहवालातून मांडला आहे.

जास्तीत जास्त लोकांची तपासणी, त्वरित निदान, तत्काळ उपचार आणि चेसिंग द व्हायरस ही मोहीम मुंबईत प्रभावी ठरली. ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच रुग्णवाढीचा दैनंदिन दर आता सरासरी १.३३ टक्के उरला आहे. दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण एक टक्क्याहून खाली आल्याने कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला, असे मानले जाते. मुंबई त्या टप्प्यावर असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी गेल्या आठवड्यात निदर्शनास आणले होते.त्यानंतर आता आय.आय.टी. मुंबईचे प्रा. भास्करन रमण यांनी कॅलिफोर्नियातील स्टँडर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल लेविट यांच्या सिद्धांताच्या आधारे कोरोनाचा प्रसार असलेले अन्य देश व भारतातील प्रसाराचा अहवाल मांडला. त्यानुसार मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येण्यास आणखी दोन आठवडे, महाराष्ट्रात दोन महिने, दिल्लीत अडीच आठवडे तसेच देशातील अन्य शहरांत अडीच महिन्यांचा कालावधी लागेल, असा निष्कर्ष मांडला.परिस्थिती नियंत्रणातमुंबईत आतापर्यंत ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रुग्णांची दैनंदिन वाढ १.३३ टक्के आहे. कोणत्याही साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, हे महत्त्वाचे असते. मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये सर्व व्यवस्था आहे. आरोग्य यंत्रणा तत्पर आहे, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई