Join us  

CoronaVirus News : 'अंत्यविधीनंतर घेतला काेराेना रुग्णाचा स्वॅब!, ‘क्यूआर’ कोडमधून उघड झाला प्रकार; तीन मिनिटांत दिला निगेटिव्ह अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 7:05 AM

CoronaVirus News: राजेश यांना स्वॅब कलेक्शन वेळेबाबत संशय आल्याने त्यांनी काेराेना चाचणी अहवालावर असलेला ‘क्यूआर’ कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात राजेश्वरी यांच्या नावे १५ एप्रिल, २०२१ रोजी तयार करण्यात आलेला दुसरा अहवाल त्यांना सापडला.

- गौरी टेंबकर - कलगूटकर

मुंबई : लॅबने कोरोना अहवाल न दिल्याने रेमडेसिविर इंजेक्शनअभावी १४ एप्रिलला रात्री राजेश्वरी सावंत (४१) यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांचे पती राजेश यांनी केला. त्यानंतर लॅबकडून जो अहवाल त्यांना देण्यात आला, त्याचा ‘क्यूआर’ कोड स्कॅनिंग केल्यावर राजेश्वरी यांचा स्वॅब अंत्यविधीनंतर घेण्यात आल्याचा उल्लेख असून, अवघ्या तीन मिनिटांत त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचाही निर्वाळा लॅबकडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.राजेश्वरी यांचे पती राजेश यांनी पत्नीचा आरटपीसीआर अहवाल मिळवला. ज्यात १० एप्रिल, २०२१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्वॅब घेऊन नंतर सकाळी १० वाजता कांदिवलीच्या साईनगरमध्ये जाऊन त्यांनी स्वॅबचा नमुना दिला. राजेश यांना मिळालेल्या अहवालात रजिस्ट्रेशनची वेळ ३ वाजून ३३ मिनिटे, स्वॅब कलेक्शनची वेळ ३ वाजून ३९ मिनिटे, तर अहवाल हा ११ एप्रिल, २०२१ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांचा असल्याचे दाखविण्यात आले आहे.राजेश यांना स्वॅब कलेक्शन वेळेबाबत संशय आल्याने त्यांनी काेराेना चाचणी अहवालावर असलेला ‘क्यूआर’ कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात राजेश्वरी यांच्या नावे १५ एप्रिल, २०२१ रोजी तयार करण्यात आलेला दुसरा अहवाल त्यांना सापडला. ज्यात रजिस्ट्रेशनची १२ वाजून ३३ मिनिटे, स्वॅब कलेक्शन १२ वाजून ३४ मिनिटे आणि अहवाल १२ वाजून ३५ मिनिटे, अशी दुपारची वेळ आहे. म्हणजे अवघ्या तीन मिनिटांतच त्या कोविड निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. शिवाय त्या १४ एप्रिलला रात्री वारल्या व त्यांचा अंत्यविधीही करण्यात आला. मात्र, स्वॅब कलेक्शन अंत्यविधीनंतरचा दाखविण्यात आल्याने लॅबच्या कारभारावर राजेश यांनी संशय व्यक्त केला.

संबंधितांवर गुन्हा दाखल करणार!बनावट कोरोना अहवालावर अंकुश बसविण्यासाठी लॅबकडून ‘क्यूआर’ कोड दिला जातो. मात्र, आता पालिकेच्या लॅबकडूनच हा प्रकार घडला असून, संबंधितांविराेधात तक्रार दाखल करणार असल्याचे राजेश यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वरिष्ठांशी चर्चा सुरूमी याप्रकरणी लॅबच्या डॉक्टरशी संपर्क साधला तेव्हा आपण रिपोर्ट डाऊनलोड करतो त्यादिवशीची तारीख त्यात रिफ्लेक्ट होते, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करत आहे.-विशाल देशमुख, सहायक आरोग्य अधिकारी, आर. दक्षिण विभाग 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई