Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News :‘ब्रुसेला न्यूमोनिया’ हा दुर्मीळ आजार झालेल्या रुग्णावर यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 04:49 IST

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वासोच्छवासात अडथळे येणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोविडची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई : एकीकडे संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट पसरले असून नागरिकांमध्ये या आजाराविषयी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची लक्षणे, काळजी याविषयी विविध स्तरांतून जनजागृती करण्यात आली असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वासोच्छवासात अडथळे येणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोविडची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.अशीच लक्षणे आढळल्याने ४९ वर्षीय गृहस्थाला चेंबूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णाच्या कोविडसंबंधी सर्व चाचण्या निगेटिव्ह दर्शविण्यात आल्या. तपासणीअंती या रुग्णाला ‘ब्रुसेला न्यूमोनिया’ असा प्राण्याच्या प्रजातींपासून होणाऱ्या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याचे समजले. डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांनंतर हा रुग्ण आता पूर्ण बरा झाला असून चेंबूर येथील रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. चेंबूर रुग्णालयातील इंटेसिव्हिस्ट आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत शहा यांनी सांगितले.रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सुरुवातील कोविडसाठी प्राथमिक स्वॅब चाचणी करण्यात आली आणि या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह दर्शविण्यात आला. मात्र या रुग्णाला नवव्या दिवशीही ताप, अतिसार, श्वासासंबंधी तक्रारी दिसून आल्या. वारंवार तपासणी करूनही त्याच्या अहवालामध्ये डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स आणि लिम्फोसाइट्सचे प्रमाण मात्र कमी झाल्याचेदिसून येत होते. तसेच कोविडचा अहवालही पुन्हा निगेटिव्ह दर्शविण्यात आला. त्यानंतर या रुग्णाची लक्षणे पाहता तपासणीअंती या रुग्णाला ब्रुसेला न्यूमोनियाचे निदान झाले.ब्रुसेलोसिस हा ब्रुसेला या जीन्समुळे होणारा झुनोटिक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे. हा संसर्ग सामान्यत: दूषित प्राण्यांशी थेट संपर्क साधून किंवा अनपाश्चराईज्ड दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने आणि संसर्गजन्य हवेतील कणांच्या माध्यमातून श्वासोच्छवासाद्वारे त्याचा प्रसार होतो. यामध्ये थकवा, ताप, अंगदुखी आदी लक्षणांचा समावेश आहे. ताप हे या आजाराचे सर्वसामान्य लक्षण आहे.>निदान करणे हे आव्हानताप हे या आजाराचे सर्वसामान्य लक्षण आहे. कोरोनासारख्या विषाणूजन्य बाधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता त्यांच्यावर उपचार करताना सारखीच लक्षणे आढळणाºया इतर आजाराचे निदान करणे, मग त्यावर उपचार करणे आणि रुग्णाला ठणठणीत बरे करणे हेसुद्धा एक आव्हानच होते, अशी माहिती डॉ. शहा यांनी दिली.