Join us  

CoronaVirus News : मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचं ‘मिशन झीरो’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 6:46 AM

CoronaVirus News : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने काही विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम आखला आहे.

मुंबई : मुंबईतील रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मुलुंड-भांडुप या परिसरात अद्याप रुग्णांची संख्या वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी महापालिकेने या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत ‘मिशन झीरो’ म्हणजेच शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्याचा निर्धार करण्यात आला आहे.पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या उपक्रमाची माहिती अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ५० फिरते दवाखाने (मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करून बाधितांचा शोध घेणार आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा आरंभ आयुक्तांनी सोमवारी केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, एमसीएचआय-क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष नयन शाह, माजी अध्यक्ष धर्मेश जैन, उपाध्यक्ष नैनेश शाह तसेच देश अपनाये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.असे आहे मिशन झीरोमिशन झीरो अंतर्गत शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी डॉक्टर्स व औषधांसह ५० फिरत्या दवाखान्यांची वाहने मुलुंड, भांडुप, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या सर्व परिसरांमध्ये जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करून नागरिकांना औषधही देतील.दोन ते तीन आठवडे युद्धपातळीवर हे काम करून या भागातील रुग्णांची तपासणी नियमित केली जाणार आहे. यातूनच कोरोना संशयित रुग्णांना त्वरित वेगळे करून त्याच परिसरात त्यांची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाणार आहे. बाधितांचा वेळीच शोध घेऊन उपचार करण्यावर यात भर असणार आहे. कोरोनाविषयीची माहिती पुरवून रुग्णांसह जनतेची काळजी घेणे, नागरिकांच्या मनामधील अवास्तव भीती कमी करणे तसेच दैनंदिन काम करण्यासाठी नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.यामुळेच या विभागात झीरो मिशनरुग्णदुपटीचा सध्याचा ३६ दिवसांचा सरासरी कालावधी ५० दिवसांपर्यंत नेऊन पुढे आणखी वाढविण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मात्र मालाड (पी/उत्तर), बोरीवली (आर/मध्य विभाग), दहिसर (आर/उत्तर विभाग), कांदिवली (आर/दक्षिण विभाग), भांडुप (एस विभाग), मुलुंड (टी विभाग) आदी परिसरामध्ये रुग्णदुपटीचा कालावधी हा मुंबईतील सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. या उपनगरांमध्ये मोठ्या इमारतींमध्येदेखील संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानिक विभाग कार्यालयांच्या माध्यमातून उपाययोजना करूनही हा संसर्ग वाढल्यामुळे आता विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.खासगी संस्थांची विनामूल्य सेवा पालिकेबरोबरच स्थानिक डॉक्टर्स तसेच भारतीय जैन संघटना, देश अपनाये, क्रेडाई-एमसीएचआय यांच्याकडून सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर फिरते दवाखाने वाहने, डॉक्टर्स व औषधे दिली जाणार आहेत. तर चाचणी व अलगीकरण व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून केली जाईल.>जुलै मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणातमुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला आहे. वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यांसारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. पालिकेच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, जनता यांचे सहकार्य लाभत आहे.याच वेगाने आपण सर्व मिळून कोरोनाविरुद्ध लढत राहिलो तर जुलै मध्यापर्यंत कोविड संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल, असा विश्वास मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.(‘फेसबुक’ने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे; मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

टॅग्स :सकारात्मक कोरोना बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका