Join us

CoronaVirus News : वांद्रे, खारमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ७६ दिवस, कोरोना नियंत्रणासाठीचे उपाय ठरले प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 01:02 IST

घरोघरी केलेली तपासणी, आवश्यकतेनुसार घरीच ऑक्सिजन देणे, प्रभावी क्वारंटाइन तसेच बाधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी हे या विभागाच्या यशामागचे सूत्र आहे.

मुंबई : वरळी, धारावीतील उपाययोजनांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी यामध्ये एच पूर्व विभाग अव्वल ठरले आहे. वांद्रे पूर्व, खार, सांताक्रुझ परिसराचा समावेश असलेल्या या विभागात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी मुंबईत सर्वाधिक ७६ दिवसांचा आहे. घरोघरी केलेली तपासणी, आवश्यकतेनुसार घरीच ऑक्सिजन देणे, प्रभावी क्वारंटाइन तसेच बाधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी हे या विभागाच्या यशामागचे सूत्र आहे. परिणामी, या विभागात रुग्णवाढीची आठवड्याची सरासरी ०.९ टक्के आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ३६ दिवस आणि सरासरी वाढ १.९६ एवढी आहे. मात्र एच पूर्व विभागात तब्बल अडीच महिन्यांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. २३ मार्च रोजी या भागात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर येथील झोपडपट्टी विभागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या येथील वस्त्यांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे म्हणजे एक आव्हान आहे. येथे नियमांचे पालन होत आहे का? यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने पहिल्यांदाच २४ एप्रिलपासून ड्रोनचा वापर सुरू केला. बेहरामपाडा, भारतनगर, गोळीबार अशा दाटीवाटीच्या या परिसरात आरोग्य कर्मचारी प्रत्येक नागरिकाची तपासणी करू लागले. सावर्जनिक ठिकाणी स्पर्शविरहित सॅनिटायझेशन व्यवस्था, शौचालयांचे दिवसातून ५-६ वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर बाधित क्षेत्रात पोलिसांच्या मदतीने संपूर्ण नाकाबंदी अशा उपाययोजना करण्यात आल्या. महिन्यात शंभर रुग्ण सापडणाऱ्या या विभागात आता जेमतेम २० रुग्ण आढळून येत आहेत.>१८ बाधित क्षेत्र : पालिकेचा समन्वयवांद्रे पूर्व, खार, सांताक्रुझ या विभागात १८ बाधित क्षेत्र आणि १६० ठिकाणी इमारती व इमारतींचा भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रातील लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. एच पूर्व विभागात आतापर्यंत २६०७ रुग्ण सापडले आहेत. या विभागात आतापर्यंत तीन लाख ५१ हजार ९२५ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. केंद्रीय पथकाने या विभागाला वेळोवेळी भेट देऊन येथील उपाययोजनांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या