Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Mumbai Update: रुग्णालयांमध्ये खाटांची मागणी वाढली; मुंबईकरांचा कल खासगी रुग्णालयांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 05:27 IST

कोरोना रुग्णांचा आलेख चढाच, गेल्या दोन आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीन हजारांवरुन पाच हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ३३ हजार सक्रिय रुग्ण आहेत

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये खाटांची मागणी वाढली आहे. इमारतींमधील रुग्णांची संख्या अधिक असल्याने बहुतांशी रुग्ण खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. अंधेरीमध्ये रुग्णांची वाढ सर्वाधिक असल्याने मरोळ येथील सेव्हन हिल्स रूग्णालय भरले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने पालिकेबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये ही खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

गेल्या दोन आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीन हजारांवरुन पाच हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ३३ हजार सक्रिय रुग्ण आहेत. यावेळेस ९० टक्के बाधित रुग्ण इमारतींमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. काही उत्तुंग इमारतींमधील रहिवासी पालिका रुग्णालयात जाण्यास तयार नसतात. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. 

सेव्हन हिल्स भरलेअंधेरी भागात बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या रुग्णांसाठी येथे खाटा राखीव आहेत. या रुग्णालयात १५५० खाटा आहेत. पश्चिम उपनगरातील महत्त्वाचा रुग्णालयांपैकी हे एक असल्याने सेव्हन हिल्समध्ये गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

तर होम क्वारंटाइनसध्या बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला तरी यापैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. घरी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असल्यास अशा रुग्णांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात येते. हे पर्याय निवडण्याचे त्यांच्याकडून लिहून घेतले जाते. त्यानंतर विभागीय वॉररूममार्फत रुग्णांची नियमित विचारपूस केली जाते. 

पाच हजार खाटा शिल्लकपालिका रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी राखीव १३ हजार खाटांपैकी ६० टक्के भरल्या आहेत. सध्या पाच हजार खाटा रिक्त असून दररोज बाधित रुग्णांची संख्या पाच हजारांनी वाढत आहे. त्यामुळे पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ही जागा कमी पडत आहे. परिणामी, पालिका रुग्णालयात आणखी आठ हजार खाटा तर खासगी रुग्णालयात सुमारे अडीच हजार खाटा वाढविण्यात येणार आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या