Join us  

CoronaVirus in Mumbai : आता लोकांनी ठरवावे त्यांना लॉकडाऊन हवे का? आयुक्तांचा मुंबईकरांना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:08 PM

CoronaVirus in Mumbai : वांद्रे-कुर्ला संकुलातील भव्य कोविड केंद्रात आयुक्तांनी मंगळवारी कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.

ठळक मुद्देसर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये मिळून सुमारे २० हजारापेक्षा जास्त खाटा मुंबईमध्‍ये उपलब्‍ध राहणार आहेत. 

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मात्र घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा देतानाच नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा, अशी सूचनाही आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केली आहे. आता लोकांनी ठरवावे त्यांना लॉकडाऊन हवे का? असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. (CoronaVirus in Mumbai: Now people should decide whether they want lockdown? Commissioner's question to Mumbaikars)

वांद्रे-कुर्ला संकुलातील भव्य कोविड केंद्रात आयुक्तांनी मंगळवारी कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. मुंबईत कोविड उपचारांसाठी खाटांची कोणतीही कमतरता नाही. सध्या अतिदक्षता विभागात ६५० खाटा व २५० व्हेंटिलेटर उपचारांसाठी उपलब्ध आहेत. तसेच खाटा वाढिवण्याची कार्यवाही देखील टप्याटप्याने सुरु आहे. तसेच पुढील १५ दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र  कोविड निर्बंधांचे पालन नागरिकांनी केले नाही, तर आवश्यक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे आयुक्तांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

लसीकरणाचा वेग वाढविणार..... मुंबईत लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्‍या ४० लाख आहे. आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्‍यात आले आहे. सध्‍याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी आहे. ती दररोज एक लाखांवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. त्‍यासाठी आणखी २६ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी, म्‍हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. सध्‍या ५९ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणाची परवानगी असून त्‍यांनी लसीकरणाची दैनंदिन संख्‍या वाढवावी, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. लसीकरणाचा वेग वाढला तर संसर्ग निश्चितच आटोक्‍यात येईल, असा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जम्बो सेंटर्समध्ये खाटा... बीकेसी कोविड सेंटर टप्‍पा २ मध्‍ये ७५०, गोरेगांव येथील नेस्‍को कोविड सेंटरमध्‍ये एक हजार खाटा उपलब्‍ध करण्यात येणार आहेत. नेस्‍कोची क्षमता तीन हजार खाटांची असून सध्‍या एक हजार खाटा उपलब्‍ध आहेत. बीकेसीमध्‍ये २,१०० खाटा क्षमता असून सध्‍या एक हजार खाटा उपलब्‍ध आहेत. रिचर्डसन क्रूडास कोविड सेंटरमध्‍ये ७०० खाटा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. जम्‍बो सेंटर्समध्ये एकूण नऊ हजार खाटा उपलब्‍ध असतील. सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये मिळून सुमारे २० हजारापेक्षा जास्त खाटा मुंबईमध्‍ये उपलब्‍ध राहणार आहेत.  

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस