Coronavirus: परराज्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ; मुंबईतील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलं अन्नछत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:02 IST2020-03-29T16:02:17+5:302020-03-29T16:02:34+5:30
मुंबई फेरबंदर येथील फेरबंदर नवरात्रौत्स मंडळ, साई सेवक पालखी सभासद, फेरबंदर मित्र मंडळ भावा ग्रुप आणि सर्व मित्र सामाजिक समूहांच्या मदतीने गरीब मजूर कामगार यांनी अन्नछत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

Coronavirus: परराज्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ; मुंबईतील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलं अन्नछत्र
मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र या परिस्थितीत गरिब मजुरांची अवस्था बिकट झाली आहे. रोजगार बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे या लोकांच्या मदतीला मुंबईतील मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई फेरबंदर येथील फेरबंदर नवरात्रौत्स मंडळ, साई सेवक पालखी सभासद, फेरबंदर मित्र मंडळ भावा ग्रुप आणि सर्व मित्र सामाजिक समूहांच्या मदतीने गरीब मजूर कामगार यांनी अन्नछत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मार्च २०२० पासून सुरु झालेल्या लॉक डाऊन च्या काळात कॉटन ग्रीन पूर्व येथे परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात अडकून राहिले होते. अन्नपाण्याविना व्याकूळ असणाऱ्या या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.
अशा प्रतिकूल परिस्थितीत फेरबंदर येथील कार्यकर्ते एकत्र येऊन त्या सर्व लोकांसाठी अन्नछत्र चालवण्याचे ठरवून हालचाल करण्यास सुरुवात केली. विभागीय सर्व मंडळांनी सहभाग घेतला तसेच काळाचौकी पोलीस स्टेशनचेही सहकार्य लाभले. मंडळाचे कार्यकर्ते संतोष सिंग, विशाल भिसे, चेतन फोंडेकर, श्रीराम चव्हाण, मयूर पाथरे, हर्षद तोरस्कर, परेश कुवसेकर, शुभम कांबळे, अमोल हांडे, दत्ताराम कदम, अविनाश जाधव, सचिन पवार, दीपक घाटगे यांनी महत्त्वाचा सहभाग आणि पुढाकार घेऊन अन्नछत्र सुरु केले.
या अन्नछत्रात १५० ते २०० मजुरांना अन्नसामग्रीची आवश्यकता भासत आहे. यासाठी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.