Join us

CoronaVirus In Mumbai: होम क्वारंटाइन रुग्णांनी १७ दिवस घरीच राहावे; महापालिकेने जाहीर केले परिपत्रक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 19:20 IST

CoronaVirus In Mumbai: पालिकेचे सुधारित परिपत्रक

मुंबई - लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना  एकूण १७ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पाळावा लागणार आहे. या कालावधीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असे महापालिका प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येत आहे. याआधी होम क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांचा होता, तर त्यात कपात करून हा कालावधी दहा दिवसांचा असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. परंतु, हा कालावधी आता १७ दिवसांचा करण्यात आला असल्याचे प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले आहे.

असा आहे नियम...

लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून योग्य औषधोपचाराने लवकर बरे होऊ शकतात. असे रुग्ण बाधित झाल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. 

संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका