Join us  

CoronaVirus in Mumbai : लक्षणे, सहव्याधी नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करू नये, महापालिकेचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 9:57 PM

Asymptomatic patients will not get admission in hospital : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. सध्या ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे.

ठळक मुद्देबाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र असे रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने खाटांची कमतरता जाणवू शकते.

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने खाटांचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने सोमवारी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार पालिका, शासकीय, खाजगी रुग्णालयांमध्ये वॉर्ड वॉर रूममार्फतच रुग्णांना दाखल केले जाणार आहे. तर लक्षणविरहित व सहव्याधी नसलेल्या रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात येऊ नये, असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.(CoronaVirus in Mumbai: Asymptomatic patients will not get admission in hospital)

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. सध्या ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. परिणामी, पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये आता ३० टक्केच खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील ८० टक्के कोविड खाटा  आणि शंभर टक्के अतिदक्षता विभागातील खाटा पालिकेने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. प्रत्येक बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी स्थानिक विभाग कार्यालयातील वॉर रूमवर असणार आहे. वॉर रूमला न कळवता कोणत्याही रुग्णालयाला रुग्ण दाखल करून घेता येणार नाहीत.

लक्षणे असलेल्या रुग्णांना खाटा नाहीत...बाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र असे रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने खाटांची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना कोणताही अन्य आजार नसल्यास पालिका अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊ नये. तसेच दाखल केले असल्यास त्यांना तात्काळ डिस्चार्ज देण्यात यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयावर साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

फायर ऑडिट बंधनकारक...सनराईस रुग्णालयातील आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांना बांधकाम स्थैर्यता आणि फायर ऑडिट तात्काळ करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच महापालिकेने वेळोवेळी मागवलेली सर्व माहिती देण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई