Join us  

CoronaVirus in Mumbai : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक ८८३२ रुग्ण, २० रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 10:29 PM

CoronaVirus in Mumbai : रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा सहा हजारांवर पोहोचला आहे.

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी मुंबईत झाली. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.  (CoronaVirus in Mumbai:  Mumbai has the highest number of 8832 corona patients todays,  20 deaths)

गेल्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा सहा हजारांवर पोहोचला आहे. गुरुवारी तब्बल आठ हजार ६४६ बाधित रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी यामध्ये आणखी वाढ होत दिवसभरात आठ हजार ८३२ बाधित रुग्ण सापडले आहेत. तर ५३५२ कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २० रुग्णांपैकी १६ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये १३ पुरुष तर सात महिला रुग्णांचा समावेश आहे. १७ मृत ६० वर्षांवरील होते तर तीन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील आहेत.  

आतापर्यंत ११ हजार ७२४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मार्च २०२० ते २ एप्रिल २०२१ पर्यंत मुंबईतील बाधित रुग्णांची संख्या चार लाख ३२ हजार १९२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत तीन लाख ६१ हजार ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ४४ हजार ३२८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ४१ लाख ७४ हजार २५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई