Join us  

Coronavirus: लाल परीही शांत 'बस'णार, राज्यातील बससेवा 31 मार्चपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 4:09 PM

पुढील काही दिवस देशात कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तर, मुंबईतील लोकल सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, आता राज्यातील बससेवाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 

पुढील काही दिवस देशात कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. म्हणूनच, उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या नागरी भागात 144 कलम नाइलाजास्तव लावत आहे. कृपाकरून 5 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ नका. गर्दी करू नका, टोळकं किंवा ग्रुपनं कुठे फिरू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही. आता आपले आपणच आहोत. आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे, असेही ठाकरे म्हणाले. त्यानंतर, सर्व सामान्य प्रवासासाठी एसटी सेवा बंद असेल. 31 मार्च पर्यंत एसटी महामंडळाकडून एकही बस सोडली जाणार नाही. केवळ, अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बस सोडली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यामुळे, रेल्वे सेवेनंतर आता महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बससेवाही बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंत लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय रेल्वेनं जाहीर केलाय. गेल्या काही दिवसांपासून वारंवार लोकल सेवा बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला होता. अखेर आज रेल्वे प्रशासनानं लोकल सेवा बंद करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याअनिल परबबसचालक