Join us  

Coronavirus: हायअलर्ट! महानगरी मुंबईत सतराशेहून अधिक कोरोना रुग्ण; आतापर्यंत ११० बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:31 PM

८७ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार हे दीर्घकालीन आजार आहेत.

मुंबईमुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आहे. सोमवारी राज्यात मुंबई शहरात सर्वाधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता शहर उपनगरातील संख्या १ हजार ७०३ वर पोहोचली असून मृतांच्या आकड्यानेही शंभरी पार केली आहे. मुंबईचा एकूण बळींचा आकडा ११० वर पोहोचला आहे. परिणामी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जवळपास ४०० परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे. आता प्रशासनाने टास्क फोर्सची स्थापना केली असून येत्या काळात शहर उपनगरावर अधिक कठोर निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात २२९ रुग्ण तर मुंबई १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत ५ ते १२ एप्रिल दरम्यान प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोरोना (कोविड-१९) रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आळे आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ८० क्लिनिकमध्ये ३ हजार ८५ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी, १ हजार १८५ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ३२ हजार ६४५ इमारतींच्या आवारांमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यात शासकीय व निमशासकीय, मनपा इमारती, रुग्णालय, दवाखाने, कोविड बाधित रुग्णांची घरे, अलगीकरण संस्था इ.चा समावेश आहे.

मुंबईत ११० बळी, ८७ टक्के मृत्यूंमध्ये दिर्घकालीन आजारांची कारण

मुंबईत सोमवारी नोंद झालेल्या नऊ मृत्यूंपैकी ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते तर दोन मृत्यूंमध्ये वार्धक्य हे कारण संबंधित आहे. ८७ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार हे दीर्घकालीन आजार आहेत. नऊ मृत्यूंपैकी एक मृत्यू सोमवारी झाला असून अन्य सात मृत्यू रविवारी १२ एप्रिल रोजी झाला आहे. तर ४ एप्रिल रोजी झालेल्या एका मृत्यूची निश्चिती करण्यात आली आहे. या नऊ मृतांमध्ये सहा महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. नऊपैंकी सात जण ५० वर्षांपुढील असून दोन जण चाळीशीतील आहेत. नऊ मृत्यूंमध्ये कस्तुरबा रुग्णालयातील तीन, जी.टी व कुर्ला भाभामध्ये प्रत्येकी एक  आणि नायर,केईएममध्ये प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

दिल्लीत सहभागींपैकी ५० जण कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा आकडा वाढतोय

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत.  याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.

सोमवारी भरती झालेले संशयित रुग्ण              २५९

आतापर्यंत एकूण भरती झालेले संशयित रुग्ण       ४७३३

सोमवारी निदान झालेले रुग्ण                    २४२

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण                         १७०३

सोमवारी डिस्चार्ज झालेले रुग्ण                  ४३

एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण                    १४१

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई