मुंबई : देशात अनलॉक ४ सुरू होत आहे. यामध्ये ७ सप्टेंबरपासून दिल्लीत मेट्रो सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने परवानगी दिल्यास मुंबईत मेट्रो धावण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मोनोही रुळावर येण्यासाठी सज्ज आहे. अर्थात यासाठीही राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. सध्या मेट्रोसह मोनोच्या देखभाल दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेत कधीहीदाखल होण्यासाठी मोनोरेल सज्ज झाली आहे.मोनो रेलची देखभाल दुरुस्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केली जात असून, मेट्रो आणि मोनो अशा दोन्ही रेल्वे परवानगी मिळताच धावण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबापुरीतल्या बेस्ट, लोकल, मेट्रोप्रमाणे मोनोरेलची सेवादेखील ठप्प झाली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर मोनोरेल धावते.अनलॉक ४ मध्ये राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर मोनोरेलची सेवा प्रत्यक्ष सुरू करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून मोनोरेलच्या देखभाल दुरुस्तीच्या सुरू असलेल्या कामाला प्रशासनाने आता वेग दिला आहे.परवानगीची प्रतीक्षादेखभाल दुरुस्तीच्या कामाचा एक भाग म्हणून मोनोरेलची चाचणी घेतली जात आहे. मोनोरेलची सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली की, प्रवाशांच्या सेवेत धावण्यासाठी मोनोरेल सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले.
coronavirus: प्रवासी सेवेत रुजू होण्यासाठी मोनोरेल सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:55 IST