Join us  

coronavirus: यूएईत अडकलेल्या भारतीयांना मसालाकिंग दातार यांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:59 AM

डॉ. दातार यांनी विविध संस्था व व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते मदत करतात.

दुबई : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) अडकलेल्या भारतीयांसाठी अल अदील समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशांतील विमानसेवा नुकतीच सुरू झाली. मात्र, लॉकडाऊनला तोंड देताना अनेक भारतीयांकडील पैसे संपले आहेत. अशा गरजूंच्या तिकीट खर्चाचा तसेच त्यांच्या कोविड चाचणी शुल्काचा वाटा डॉ. दातार उचलणार आहेत.यासंदर्भात डॉ. दातार म्हणाले, परदेशांतील भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार जगात अशा स्वरुपाचा सर्वांत मोठा उपक्रम आहे. आखाती देशांत शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय कोविड साथीमुळे अडकून पडले आहेत. हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या स्थितीत देशबांधवांना सामाजिक बांधिलकीच्या हेतूने मदतीचा निश्चय मी व माझ्या समूहाने केला आहे. ते पुढे म्हणाले, हे सहाय्य करताना आम्ही संबंधित यंत्रणांची मंजुरी घेऊनच समन्वय साधत आहोत. यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे कॉन्सुलेट जनरल विपुल यांच्याशी चर्चा केली आहे.डॉ. दातार यांनी विविध संस्था व व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते मदत करतात. त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासंयुक्त अरब अमिराती