Join us  

CoronaVirus News: रुग्णवाहिकेत चढताना तो म्हणाला मित्रा, मी पुन्हा येईन... व्हिडीओ पाहून रितेशनं केला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 8:11 AM

सोशल मीडियावर गेल्या २ दोन दिवसांपासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई पोलीसच्या ट्विटर अकाऊंटवरुन गुरुवारी रात्री हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मुंबई - राज्यात एप्रिलअखेरीस कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांजवळ पोहोचली आहे. ही परिस्थिती दिवसागणिक यंत्रणांसाठी आव्हानात्मक होते आहे. या कोरोनाबाधितांमध्ये ७० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिकमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे राज्यात आत्तापर्यंत ३ पोलीस शिपायांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली. त्यामुळे, पोलिसांचे कुटुंबींय काळजीत आहे. मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये २९ वर्षीय तरुण पोलीसाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजते. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेता रितेश देशमुखने राज्यातील सर्व पोलिसांना सलाम केला आहे.  

सोशल मीडियावर गेल्या २ दोन दिवसांपासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई पोलीसच्या ट्विटर अकाऊंटवरुन गुरुवारी रात्री हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, कोरोना कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या २९ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. ज्यावेळी, एका तरुण पोलिसाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येते, त्यावेळी अॅम्ब्युलन्समध्ये चढण्यापूर्वी त्याचे सहकारी मित्र भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या तरुणाने आत्मविश्वासाने आपल्या मित्रांना धीर दिला. घाबरु नको रे मित्रा, मी ड्युटीवर परत येईन... असे म्हणत तो मित्रांना बाय करुन उपचारासाठी तो अॅम्ब्युलन्समध्ये बसतो. मुंबई पोलीसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ अतिशय भावुक आहे. तसेच, या व्हिडीओतून पोलीस दलाचे कार्य आणि कार्यतत्परता दिसून येते. त्यामुळेच, अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत, तुम्हा सर्वांना माझा सलाम असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करताना, आम्ही ड्युटीवर आहोत, मुंबई पोलीस ऑन ड्युटी असे हॅशटॅग वापरले आहेत. 

आणखी वाचा

मुलांसाठी गुडन्यूज ....  शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार 

'संकटाकाळत देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात'

बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले तु्म्ही फक्त पत्ता सांगा

दरम्यान, राज्यात बुधवारी ५९७ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल १० हजारांच्या टप्प्यावर आहे. सध्या राज्यात ९ हजार ९१५ कोरोना रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी ३२ मृत्यूंची नोंद झाली; त्यामुळे मृतांची संख्या ४३२ झाली आहे. सर्वाधिक रुग्णांचे प्रमाण राजधानी मुंबईतील आहे. मुंबईत बुधवारी ४७५ रुग्णांचे निदान झाले असून, रुग्णसंख्या ६ हजार ६४४ झाली आहे. तर २६ मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली असून, बळींचा आकडा २७० वर गेला आहे. राज्यात बुधवारी नोंदलेल्या मृत्यूंमध्ये २६ मुंबईतील असून, पुण्यातील तीन, सोलापूर, औरंगाबाद व पनवेल शहरातील प्रत्येकी एक आहे.

टॅग्स :रितेश देशमुखकोरोना वायरस बातम्यामुंबई पोलीसपोलिस