Join us  

Coronavirus In Maharashtra: सक्रिय रुग्णसंख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर; राज्यात महिनाभरात तिपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:45 AM

राज्यात महिनाभरात तिपटीने वाढ

मुंबई : राज्यात काेराेनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढली असून, गेल्या महिनाभरात त्यात तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २१ मार्च रोजी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ लाख १० हजार १२० एवढी होती. ती २३ एप्रिल रोजी ६ लाख ९१ हजार ८५१ एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नाेंदवले. राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता सात लाखांच्या उंबरठ्यावर आहे.

सक्रिय रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५५ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रोजची नोंद ६० हजारांच्या आसपास होत असताना सक्रिय रुग्णसंख्येत दररोज ६ ते १० हजारांनी भर पडत आहे. बुधवारी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ६,९५,७४७ एवढी होती, तर मंगळवारी ६,८३,८५६, सोमवारी ६,७६,५२०, रविवारी ६,७०,३८८, तर शनिवारी ६,४७,९३३, तसेच मागच्या शुक्रवारपर्यंत ६,३८,०३४ एवढी हाेती.

बुधवारी त्यात ११,८९१, तर मंगळवारी ७,३३६ रुग्णांची भर पडली. सोमवारी ६,१३२, रविवारी २२,४५५, तर शनिवारी ९,८९९ अशी भर पडली. याचाच अर्थ बुधवारी २१ एप्रिल राेजी सक्रिय रुग्णसंख्येत मंगळवार २० एप्रिलच्या तुलनेत ११,८९१ ने अधिकची भर पडली. अशाच प्रकारे मंगळवारी ७,३३६, सोमवारी ६,१३२, रविवारी २२,४५५, तर शनिवारी ९,८९९ अशी सक्रिय रुग्णसंख्येत भर पडतच गेली. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे. 

रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास महिना जाणार

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याचे खरे असून, ही संख्या नियंत्रणात यायला महिना लागेल. सध्या डबल म्युटंट स्ट्रेन असल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे. शिवाय लसीकरणही तेवढ्या संख्येने झालेले नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. दुसरीकडे वर्षभरापासून यंत्रणा मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखण्याविषयी सूचना करत असतानाही याचे काटेकोरपणे पालन होत नाही, त्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख चढताच असल्याचे दिसून येत आहे.-डॉ अविनाश सुपे, राज्य  कोरोना कृती समिती 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या