Join us  

Coronavirus : मॅडम, कोरोनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची, सेक्स वर्कर महिलांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:09 AM

कामाठीपुरा, ग्रॅण्ट रोड, सोनापूरसारख्या विविध रेड लाइट विभागात सेक्स वर्कर महिला मास्कऐवजी ओढणीचा आधार घेताना दिसत आहेत.

- मनीषा म्हात्रेमुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग पुणे, मुंबई, ठाण्यात धडकल्याने सगळीकडेच कोरोनाबाबत उपाययोजना सुरू असताना, रेड लाइट विभागाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. मास्कसह, सॅनिटायझर खिशाला परवडणारे नाहीत. अशात, कोरोनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची असे सेक्स वर्कर महिलांचे म्हणणे आहे.कामाठीपुरा, ग्रॅण्ट रोड, सोनापूरसारख्या विविध रेड लाइट विभागात सेक्स वर्कर महिला मास्कऐवजी ओढणीचा आधार घेताना दिसत आहेत. साई संस्थेचे विनय वस्त यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत, कामाठीपुरामध्ये ३ हजार, फत्ते बाबुराव मार्ग येथे दीड हजार, पाववाला स्ट्रीट येथे तीनशे, ग्रॅण्ट रोडमध्ये सुमारे अडीचशेच्या आसपास सेक्स वर्कर कार्यरत आहेत.वेश्याव्यवसायाशिवाय दुसरा पर्याय उदनिर्वाहासाठी नाही. त्यात, कोरोनाबाबत त्यांच्या मनात भीती असली, तरी हवी तशी खबरदारी अजूनही घेण्यात येत नाही. संस्थेच्या प्रतिनिधींकडून याबाबत त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने स्वखर्चातून जेवढी मदत शक्य आहे, तेवढे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वीही अनेक साथींनी डोकेवर काढले होते. तेव्हाही या महिलांनी खंबीरपणे तोंड दिले. त्यामुळे घाबरण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे वस्त यांनी सांगितले.कामाठीपुरा येथील सेक्स वर्कर महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘मॅडम मास्क लावला, तर ग्राहक घाबरतात. ते मास्क लावून आले की, आम्ही घाबरतो. मात्र, पर्याय नाही. कोरोनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची. काम नाही केले, तर पैसे कुठून मिळणार, तसेच कोरोनामुळे ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. जो ग्राहक येतो, तो मास्कमुळे परत जात असल्याचे तिने सांगितले.‘प्रशासनाने मास्क, सॅनिटायझर द्यावेत’या महिलांसाठी काम करणाऱ्या घाटकोपरच्या लता माने यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने या महिलांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ३० रुपयांचा मास्क, तर १५० रुपयांचे सॅनिटायझर घेण्यासाठीही पैसे लागतात. या महिलांना ते परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाकडून त्यांना मास्क अथवा सॅनिटायझरचे वाटप होणे गरजेचे आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई