अमर मोहिते मुंबई : गाडीवर भाजी विकणाऱ्यांकडे शक्यतो आपल्याला गर्दी दिसते. कोरोनाच्या धास्तीने मुंबईकरांना भाजी घेण्यासाठी रांग लावावी लागत आहे. भितीने का होईना एक चांगली शिस्त मुंबईकरांना लागली आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारने १४४ कलम लागू केले आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मुंबईकर गर्दी करत आहेत. काही ठिकाणी गर्दी न करता नागरिक भाजीपाला घेण्यासाठी रांग लावत आहेत. दादर, नायगाव येथील गांधी चौकातील ही शिस्त इतर नागरिकांनीही अवलंबावी, असे आवाहन येथील नागरिक करत आहेत.
१४४ कलम लागू केल्याने भाजी विक्रेते तुरळक प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, आम्ही नागरिकांना रांग लावण्याचे आवाहन करत आहोत. नागरिक आमचे ऐकून रांग लावत आहेत, असे एका पोलिसाने सांगितले.
जुने दिवस आठवलेगॅस सिलिंडर घेण्यासाठी मुंबईकर गर्दी करत आहेत. पूर्वी रॉकेल घेण्यासाठी मुंबईकर डबा लावायचे. आज मुंबईकर गॅस सिलिंडर रांगेत ठेवत आहेत.