Join us  

Coronavirus :पुण्यासह औरंगाबाद, सोलापूर, धुळे आणि मिरज येथेही प्रयोगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:14 AM

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची पाहणी केली. येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला.

मुंबई - कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. कस्तुरबा गांधी रुग्णालयासह मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू केली जाईल. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दररोज २५० नमुने तपासण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येईल. बुधवारपासून या दोन्ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. याशिवाय मुंबईतील जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील ससून रुग्णालयातही पंधरा दिवसांत प्रयोगशाळा कार्यान्वित होतील, अशी माहिती मंत्री टोपे यांनी दिली.सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची पाहणी केली. येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे टोपे यांनी पाहणीनंतर सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना राज्य सरकारने मंडळाला केल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या प्रतिदिन शंभर नमुने तपासण्या इतकी कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता आहे. नवीन उपकरणांच्या आधारे या क्षमतेत वाढ केली जाईल. कस्तुरबासह मुंबई महापालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील प्रयोगशाळेतही बुधवारपासून नवीन यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे कस्तुरबा आणि के.ई.एम येथे दररोज प्रत्येकी २५० नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.कस्तुरबा, के.ई.एम.सह अन्यत्रही या व्यवस्थांचा विस्तार केला जाणार आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचे आदेश जारी केले जातील. नवीन उपकरणे आणि कुशल मनुष्यबळासाठी आवश्यक प्रशिक्षणासह पुढील पंधरा ते वीस दिवसांत या ठिकाणच्या प्रयोगशाळा कार्यरत होतील, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याशिवाय, औरंगाबाद, सोलापूर, धुळे आणि मिरज या शहरांतील वैद्यकीय महाविद्यालयातही महिनाभरात प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.राज्यात कोरोनाचे एकूण ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी नऊ रुग्णांवर कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. याशिवाय इथे ८० संशयित रुग्ण आहेत.कस्तुरबा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज साधारण ३५० नागरिक तपासणीसाठी येतात. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.कस्तुरबा रुग्णालयातील यंत्रणा सज्जडॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकरिता व्यक्तिगत सुरक्षा यंत्रणेचे ४५०० संच आणि एन ९५चे चार हजारहून अधिक मास्क रुग्णालयात उपलब्ध आहेत. येथील रुग्णांचे उपचार, जेवणापासून किमान मनोरंजनासाठी वायफाय आदी बाबींची काळजी घेतली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.सेव्हन हिल्सचा वापरपरदेशी आणि प्रवाशांच्या विलगीकरणासाठी मुंबईतील पूर्वीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या इमारतीत अद्ययावत व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. सध्या ४०० खाटांची क्षमता असून लवकरच ती एक हजारपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.अन्यथा कडक कारवाईकोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा संसर्गजन्य रोग असला तरी रोगप्रतिकारक्षमतेच्या जोरावर तो रोखता येऊ शकतो. त्यासाठी शासनाने, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. साथ प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून आवश्यक तिथे कठोर कारवाईचा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना