Join us  

CoronaVirus: 'मजूर प्रवाशांचं संकट बॉम्बसारखं; ही समस्या कोरोनापेक्षा मोठी होऊ शकते'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:08 AM

CoronaVirus: वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात उसळलेल्या गर्दीवरून कमल हासन यांचा सरकारवर निशाणा

मुंबई: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवला जात असल्याची घोषणा काल केली. मात्र यानंतर काल संध्याकाळी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मजुरांची गावी परतण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले. पोलिसांच्या शिष्टाईमुळे प्रकरण नियंत्रणात आलं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीका केली. यानंतर आता बॉलिवूडमधूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. 'बाल्कनीतून सगळे लोक जमिनीवर पाहत आहेत. आधी दिल्ली आणि आता मुंबई. प्रवासी मजुरांचं संकट आता एखाद्या बॉम्बप्रमाणे आहे. हा बॉम्ब निकामी करणं अत्यावश्यक आहे. कारण हे संकट कोरोनापेक्षा मोठं होऊ शकतं. बाल्कनी सरकारला त्यांची नजर जमिनीवर ठेवायला हवी. त्यामुळे जमिनीवर नेमकं काय घडतंय हे त्यांना कळेल,' असं हासन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. वांद्र्यात नेमकं काय घडलं?कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वांद्रे येथे स्वयंसेवी संस्था मोफत अन्नधान्य वाटप करीत होती. हे घेण्यासाठी लोक जमले असतानाच तिथे मोठ्या प्रमाणात मजूरही जमू लागले. हीच गर्दी नंतर आम्हाला धान्य नको, गावी जाऊ द्या, असं म्हणू लागली. दुपारी ३ नंतर हा गोंधळ वाढतच गेला. हे समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यात गर्दीतले काही जण हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करत त्यांना घरी पाठवलं. यात प्रचंड गोंधळ उडाला. शेकडो बिगारी कामगार मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी मुंब्य्रात रस्त्यावर उतरले होते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकमल हासन