Join us  

कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने जोगेश्वरीचे मिल्लत हॉस्पिटल बंद; 129 डायलिसिस रुग्ण पडले वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 9:09 PM

सध्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे, यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी आहे.

मनोहर कुंभेजकरमुंबई- जोगेश्वरी पश्चिम येथील मिल्लत हॉस्पिटलमध्ये येथील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सदर खासगी ट्रस्टचे हे हॉस्पिटल बंद केले आहे. मात्र येथे 129 डायलिसिस रुग्णांवर या हॉस्पिटलकडून काल पासून उपचार  नाकारले जात असल्याने या रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे, यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी आहे.

अंधेरी (पूर्व) सहार, मुंबई येथे राहणाऱ्या सनी फर्नांडिस हा डायलिसिस रुग्ण येथे उपचारासाठी काल येथे गेला असता त्याला उपचार नाकारण्यात आले. हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे आपण डायलिसिस करणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आज सकाळपासून हा रुग्ण आजूबाजूच्या सर्व रुग्णालयांत तुम्ही तरी डायलिसिस कराल का, अश्या विनवण्या करत असल्याची धक्कादायक माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी लोकमतला दिली.

 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून येथील 129 डायलिसिस रुग्णांची तातडीने अन्यत्र पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी इमेल द्वारे केली आहे. तसेच कोरोनामुळे जे खासगी डायलिसिस केंद्र बंद आहेत का? याची शासनाने पाहणी करावी अशी मागणी त्यांनी केली. अंधेरी (पूर्व) चकाला येथील दिलखेद अब्दुल जब्बार शेख या एका रुग्णाला देखिल डायलिसिस वेळेवर मिळत नसल्याची  माहिती त्यांनी दिली.

दरम्यान शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 62चे ज्येष्ठ नगरसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिल्लत हॉस्पिटलमध्ये येथील दोन कर्मचाऱ्यांना आणि इतर दोन संशयितांना कोरोनाची लागण झाल्याने पालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सदर खासगी ट्रस्टचे हे हॉस्पिटल बंद केले आहे. येथे 143 मशिन्स असून येथे 129 रुग्णांवर डायलिसिस करण्यात येते.मात्र आता येथील डायलिसिस सेंटर बंद झाल्याने त्यांची अन्यत्र पर्यायी व्यवस्था करावी, अशी विनंती आपण परिवहनमंत्री ऍड.अनिल परब यांच्याकडे केली आहे.आपण उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि श्रीसिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधून पर्यायी व्यवस्था कशी करता येईल याकडे जातीने लक्ष घालतो असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती नगरसेवक पेडणेकर यांनी दिली. तसेच महापालिकेने ज्या खासगी संस्थांना डायलिसीस सेंटरला जागा दिली आहे तिकडे येथील रुग्णांवर डायलिसीस करता येईल का याची पाहणी करा, अशी मागणी आपण पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर व पालिका उपायुक्त( आरोग्य) यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस