Join us  

Coronavirus : कोरोनाच्या योग्य माहितीसाठी वर्तमानपत्रे वाचणेच चांगले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 6:41 AM

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या संसर्गजन्य आजाराबाबत समाजमाध्यमातून तितक्याच गतीने चुकीची माहिती प्रसृत होत आहे.

मुंबई : कोरोना विषाणूबाबत सध्या समाजमाध्यमांवर नाना प्रकारच्या अफवांचे पेव फुटले आहे. अशीच एक अफवा वर्तमानपत्र आणि कोरोनाबाबत पसरली आहे. वर्तमानपत्रे वाचल्याने कोरोनाच नव्हे, तर कोणत्याही विषाणूचा संसर्ग होत नसून उलट इत्थंभूत माहितीसाठी वर्तमानपत्र वाचणे ही चांगली सवय आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या संसर्गजन्य आजाराबाबत समाजमाध्यमातून तितक्याच गतीने चुकीची माहिती प्रसृत होत आहे. कोरोनाचा संसर्ग केवळ बाधित व्यक्तींच्या संपर्कातूनच होते. मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉम्पुटरचा वापर, तसेच वर्तमानपत्रांमुळे या रोगाचा संसर्ग होत नाही. त्यामुळे यासंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले आहे.वर्तमानपत्रांमुळे कोरोनाबाबतची जगभरातील माहिती घरपोच पोहोचत असून त्यातून जनजागृती होत आहे. सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.एरवीही थंडी, ऊन्ह, वारा आणि पावसाची तमा न बाळगता भल्या पहाटे वर्तमानपत्रांचे वाटप करणारे विक्रेते आणि हॉकर्स यांनी कोरोनाच्या अफवांवर मात करत आपल्या नित्यकार्यात कोणताही खंड पडू दिला नाही, याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस