Join us  

Coronavirus: इमारतींमधील रहिवाशांमध्ये वाढली रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 8:49 PM

झोपडपट्टीमध्ये ४१ टक्के, इमारतींमध्ये २८.५ टक्के

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ९० टक्के रुग्ण इमारतींमध्ये असल्याचे समोर आले. तर संपूर्ण मुंबईत नुकत्याच करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात इमारतींमधील रहिवाशांमध्ये कोविडविरोधात रोगप्रतिकारशक्तीही वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचवेळी झोपडपट्ट्यांमध्ये हे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. यावेळी सर्व २४ विभागांमध्ये सर्वेक्षण केल्याने ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे उजेडात आले आहे.

मुंबईत पहिले सेरो सर्वेक्षण तीन विभागांमध्ये जुलै २०२० मध्ये करण्यात आले. तर दुसरे सर्वेक्षण हे त्याच तीन विभागांत ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आले. त्यानंतर आता मार्च २०२१ मध्ये सर्व २४ विभागांमधील दवाखाना, खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून जमा करण्यात आलेल्या दहा हजार १९७ रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली. लसीकरण न झालेल्या व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची चाचणी कस्तुरबा येथील अत्याधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळेत करण्यात आले. 

रोगप्रतिकारशक्ती झोपडपट्ट्यांमध्ये कमी इमारतीमध्ये जास्तपालिका दवाखान्यातून (झोपडपट्टी भागात) घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये ४१ .६ टक्के रोगप्रतिकारशक्ती आढळून आली आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये हेच प्रमाण ५७ टक्के तर दुसऱ्या सर्वेक्षणात ४५ टक्के एवढे होते. याउलट खासगी प्रयोगशाळेतून इमारतींमधील रहिवाशांच्या घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये यंदा २८.५ टक्के रोगप्रतिकारशक्ती आढळून आली आहे. पहिल्या सर्वेक्षणात हे प्रमाण १६ टक्के तर दुसऱ्यावेळी १८ टक्के होते. दुसऱ्या लाटेत इमारती, टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक बाधित आहेत. त्यामुळे तिसऱ्या सर्वेक्षणात याच भागातील नागरिकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढली असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिकमुंबईत ३५.०२ टक्के पुरुषांमध्ये तर ३७.१३ टक्के महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याचे आढळले आहे. ७० टक्के नागरिकांमध्ये एखाद्या आजारा विरोधात रोगप्रतिकारकशक्ती तयार झाल्यास उर्वरीत ३० टक्के नागरिकांचे नैसर्गिकरित्या या आजारापासून संरक्षण होते, असे वैद्यकिय शास्त्रात मानले जाते. मात्र, मुंबईत ३६ टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती आढळली असून हे प्रमाण गरजेपेक्षा निम्मे आहे.

संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आवश्‍यक

या सर्वेक्षणाच्या आधारा तज्ञांनी लसिकरणाची मोहीम अधिक गतिमान करण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी मास्क वापरणे, वैयक्तीक स्वच्छता ठेवणे आणि सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस