Join us

Coronavirus: कोरोनाविराेधी लढ्यासाठी मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 07:24 IST

Coronavirus: लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मीळ आजारावरील महागड्या उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मीळ आजारावरील महागड्या उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळून मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग लॅबदेखील सुरू करण्यात आली असून, कोरोनाविरुद्धच्या लढ्याला त्यामुळे बळ प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवाचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, मुंबईचे महापालिका आयुक्त आय. एस. चहल, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू आदी उपस्थित होते. नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, स्पायनल मस्क्यूलर ॲट्रोफीसारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. आजपासून नायर रुग्णालयात या आजारावर उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे. अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून, सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा लाभ होईल. तर, कोरोनाविरुद्धची लढाई डॉक्टर्स, कर्मचारी लढत आहेत. कोरोनाचा विषाणू नवीन अवतार घेत असतो. विषाणूने बदललेला अवतार शोधून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उपयुक्त आहे. आजपासून ही लॅब कार्यरत होईल. त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईमध्ये सुरू झालेली जिनोम सिक्वेन्सिंग लॅब स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली. त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रेज अगेन्स्ट दि डाईंग ऑफ लाईट’ या डॉ. शिशिर श्रीवास्तव लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई