Join us

coronavirus: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग

By बाळकृष्ण परब | Updated: October 1, 2020 13:12 IST

Narayan Rane tested corona positive : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवसआयसोलेशनमध्ये राहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देनारायण राणे डॉक्टरांच्या सल्लानुसार काही दिवस आयसोलेट राहणार गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे केले आवाहन लवकरच लोकसेवेत पुन्हा रुजू होण्याचा व्यक्त केला विश्वास

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले आहे.कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती देताना नारायण राणे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असे त्यांनी सांगतले आहे. 

काही दिवसांपूर्वी नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती.दरम्यान, राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. काल दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली होती. 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनारायण राणे मुंबई