Join us  

Coronavirus: आता कोरोनाच्या मृत्यूंचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पालिकेची ‘सेव्ह लाइव्ह स्टॅटर्जी’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 2:42 AM

कारणांचा शोध घेऊन उपाययोजना आखणार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत नियंत्रणात आल्यानंतर महापालिकेने आता मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘सेव्ह लाइव्ह स्टॅटर्जी’ मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूचे ‘फॉरेन्सिक आॅडिट’ होणार आहे.

रुग्णांसाठी आवश्यक सर्व औषधांचा अखंड पुरवठा ठेवणे, रुग्णाच्या केसपेपरवरील सर्व नोंदी डॉक्टरांनी नियमित तपासणे व रुग्णाच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठ-कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिवसातून दोन वेळा चर्चा करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४१ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. रुग्णालयात दाखल मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आॅक्सिजन बेड, अतिदक्षता उपचार, व्हेंटिलेटर अशा सुविधा तसेच प्लाझ्मा थेरपीसारख्या पद्धतीचा उपयोग केला जात आहे. मात्र, मृतांमध्ये ६० वर्षांवरील आणि प्रदीर्घ आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांमध्ये मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे होतो, याचा शोध घेण्यासाठी मृत्यूचे ‘फॉरेन्सिक आॅडिट’ केले जाईल. मृत्यूदर आणखी कमी होण्यासाठी पालिकेने सांघिक कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. असा आहे सांघिक कृती कार्यक्रम

  • मध्यम आणि तीव्र स्वरूपाची बाधा असलेल्या प्रत्येक रुग्णाशी वरिष्ठ-कनिष्ठ डॉक्टर यांनी दिवसातून किमान दोन वेळा व्हिडीओ, टेलिफोनच्या माध्यमातून संपर्कात राहणे बंधनकारक. 
  • असे सर्व रुग्ण हे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित आरोग्य कर्मचारी यांची सांघिक जबाबदारी असतील.
  • निश्चित करून दिलेल्या वैद्यकीय कार्यपद्धतीनुसार प्रत्येक कागदपत्रे/ दस्तावेज पडताळावीत, जेणेकरून प्रत्येक प्रक्रियेचे पालन केले जात असल्याची खातरजमा होऊन कोणतीही बाब शिल्लक राहणार नाही. 
  • अँटिव्हायरल, अँटिबायेटिक्स, स्टिरॉइड, प्लाझ्मा यासह औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करावी आणि त्यांचा योग्य उपयोग करावा.

 

रात्रीच्या वेळेत यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिकरात्री १ ते पहाटे ५ या कालावधीमध्ये रुग्ण शौचालयात जाण्यासाठी आॅक्सिजन काढून जातात आणि त्या वेळी अनेक मृत्यू घडले आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णशय्येला (बेड) एक मलपात्र असणे आवश्यक आहे. किमान चार बेडसोबत शौचकूप असावे. कार्डबोर्डपासून बनवलेले मलपात्र वापरावे.

विभाग आणि संस्थाप्रमुखांची जबाबदारीव्हिडीओ यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णावर विभागप्रमुख आणि संस्थाप्रमुख यांनी बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच कुठेही विलंब होणार नाही, कोणतीही कमतरता राहणार नाही, याची वेळोवेळी खात्री करून घ्यावी. प्रत्येक मृत्यू प्रकरणाबाबत सविस्तर परीक्षण केले जावे आणि गरजेनुसार न्यायवैद्यकीय परीक्षणासाठी व्हिडीओ तयार ठेवावा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका