Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पैशांअभावी थंडावल्या लॉकडाउनमधील अन्नछत्राच्या चुली; मदतीलाही आर्थिक ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 03:22 IST

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचा हॉटेलांचा हातही आखडता

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तींनी अन्नदानाचा यज्ञ अहोरात्र धगधगत ठेवला होता. काही हॉटेल व्यावसायिकांनी तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी आपल्या हॉटेलचे दरवाजे खुले केले होते; परंतु ४० दिवसांनंतर या मदतीला आर्थिक अरिष्टाचे ग्रहण लागले आहे. दीर्घ काळ हा खर्च करणे शक्य होत नसल्याने अनेक ठिकाणच्या अन्नछत्रांची चूल थंडावली आहे; तर भरमसाट वीजबिलांचा शॉक लागल्याने येत्या काही दिवसांत हॉटेलांची दारे वैद्यकीय कर्मचाºयांसाठी बंद होण्याची चिन्हे आहेत.

लॉकडाउनच्या काळात पहिले ४० दिवस आम्ही रोज तीन हजार लोकांना अन्नाचा पुरवठा करीत होतो. रोज किमान ६० हजार रुपये खर्च व्हायचा. अन्नदानाच्या कंटेनरसाठी रोज १२ हजार रुपये लागायचे; तर एवढ्या लोकांचे जेवण करण्यासाठी रोज दोन सिलिंडरही कमी पडायचे. गोरगरिबांसाठी ही कामे आम्ही करीत होतो. आजवर २० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला. यापुढे हा भार पेलणे शक्य नसल्याने ५ मेपासून अन्नवाटप बंद केल्याची माहिती प्रथितयश हॉटेल व्यावसायिकाने दिली. अनेक राजकीय नेत्यांनीही अन्नवाटपाच्या कामातून माघार घेतल्याचे चित्र आहे.

स्वयंसेवी संस्था दीर्घकाळ ही मदत करू शकत नसल्याने त्यांनाही नाइलाजास्तव हात आखडते घ्यावे लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अन्नदानाचे काम करताना काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने अनेकांवर भीतीचे सावट आहे. त्यामुळेही या मदतीत खंड पडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अन्नवाटपाचे प्रमाण निम्म्यावर आल्याचेही या कामांवर राबणाºया लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या सर्व संकटानंतरही काही दानशूरांनी आपल्या कामात खंड पडू दिलेला नाही.पालिका आयुक्तांना पत्रठाण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या तीन हॉटेलांमधील रूम दूर राहणाºया वैद्यकीय कर्मचाºयांच्या वास्तव्यासाठी दिल्या. मात्र, यामुळे गेल्या महिन्यातील विजेचे बिल आठ लाख रुपये आले. हे बिल भरले; परंतु पुढील महिन्यात तो खर्च करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या कर्मचाºयांची १७ मेनंतर अन्यत्र व्यवस्था करावी, अशी विनंती करणारे पत्र ठाणे महापालिका आयुक्तांना पाठविल्याचे या हॉटेल मालकाने सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या