Join us  

Coronavirus: 'त्या' व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच; राज्यातील मृतांचा आकडा १० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 6:09 PM

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; २१६ जणांना संसर्ग

मुंबई: राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आली आहे. आज सकाळीच पुण्यात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज मिळाला. त्यामधून त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचं स्पष्ट झालं. यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या राज्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. आज सकाळीच पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात कोरोनामुळे एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीला डायबिटीस आणि हायपरटेंशनचा त्रास होता, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णावर उपचार सुरू होते. या व्यक्तीला आधीपासूनच फुफ्फुसांचा आजार होता. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यक्तीनं कोणताही परदेश दौरा केलेला नव्हता. याशिवाय ही व्यक्ती परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कातदेखील आली नव्हती. हा पुण्यातील कोरोनाचा पहिलाच बळी ठरला.

सदर व्यक्तीला २१ मार्च रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी काल राज्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. एका ४० वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात श्वसनाचा त्रास झाल्यानं मृत्यू झाला होता. ती कोरोनाबाधित असल्याचं आज स्पष्ट झालं. तिला उच्च रक्तदाबही होता. तर बुलढाण्यात एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस