Join us

Coronavirus: सायन रुग्णालयात आजपासून ‘कोव्हॅक्सिन’ची चाचणी; २००-३०० व्यक्तींना लस देण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:50 IST

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)च्या मदतीने विकसित केलेल्या देशी लसीच्या चाचणीसाठी भारत बायोटेकने पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड केली आहे.

मुंबई : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन  लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड करण्यात आली. या चाचणीत सहभागी होण्यासाठी जवळपास ३००हून अधिक जणांनी सायन रुग्णालय प्रशासनाकडे नोंदणी केली आहे. आता लसीची चाचणी सुरू करण्यासाठी एथिकल कमिटीकडून रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून येथे चाचणी सुरू होणार आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)च्या मदतीने विकसित केलेल्या देशी लसीच्या चाचणीसाठी भारत बायोटेकने पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड केली आहे. देशभरातील २५ केंद्रांमध्ये २६ हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, सुरुवातीच्या टप्प्यात २००-३०० व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याचे परीक्षण करून चाचणीबाबत पुढील दिशा ठरविण्यात येईल. सायन रुग्णालयात लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे.

सायन रुग्णालय आणि वैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, ही फेज-३ चाचणी असल्याने हजाराहून अधिक स्वयंसेवकांवर ती करावी लागेल. आतापर्यंत ३०० लोक लस घेण्यास उत्सुक आहेत. चाचणीसाठी एकूण स्वयंसेवकांपैकी २० टक्के सहभाग अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांचा असेल. यात हृदयविकार, मूत्रपिंड, यकृतविकार व अन्य आजारांचा समावेश असेल. पाच टक्के सहभाग हा आरोग्य कर्मचाऱ्यांचा असेल.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासायन हॉस्पिटल