Join us  

coronavirus: मुंबईतील कोरोना मृत्युदरात अखेर घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 4:38 AM

Mumbai coronavirus : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५.६ टक्के असलेला मृत्युदर आता चार टक्क्यांवर खाली आला आहे. मात्र मार्च - एप्रिल महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याने मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे.

मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असताना मुंबईतील मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नांना अखेर यश येऊ लागले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५.६ टक्के असलेला मृत्युदर आता चार टक्क्यांवर खाली आला आहे. मात्र मार्च - एप्रिल महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याने मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे.मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर मार्च - एप्रिल महिन्यात मृत्युदर ३.२ ते ३.६ टक्के होता. विविध उपाययोजनांमुळे मे महिन्यानंतर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येऊ लागला. मात्र मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने मृत्युदरात वाढ झाली. आतापर्यंत दहा हजार ६२ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला. यापैकी बहुतांशी रुग्णांमध्ये अन्य गंभीर आजार असल्याने कोरोना त्यांच्या जीवावर बेतला.त्यामुळे महापालिका प्रशासनाने ३० जूनपासून ‘मिशन सेव्ह लाइफ’ ही मोहीम सुरू केली. तसेच पालिका रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील प्रत्येक रुग्णावर विशेष लक्ष देऊन मृत्यूचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नऊ कलमी कार्यक्रमामुळे कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले. मात्र राज्यातील २.६३ टक्के मृत्युदराच्या तुलनेत मुंबईतील मृत्युदर अधिक आहे.पालिकेच्या प्रयत्नांना यश२५ मेपर्यंत मुंबईत एक हजार मृत्यूची नोंद झाली. ८ जुलैपर्यंत मृत्युदर वाढून ५.६ टक्क्यांवर पोहोचला. खासगी रुग्णालयांमधील सुमारे एक हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद जून, जुलैमध्ये झाल्यामुळे ही वाढ दिसून आली. आजारावर घरगुती उपचार करणे, डॉक्टरकडे उशिरा जाणे, उशिरा चाचण्या करणे यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. तसेच मधुमेह आणि हायपरटेन्शन असलेल्या बाधित रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.दरम्यान, पालिकेने विभागीय वॉर रूममार्फत बाधित रुग्णांना खाटांचे  वितरण, रुग्णांना वेळेत योग्य उपचार उपलब्ध केल्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई