Join us  

Coronavirus: आर्थिक राजधानी झाली कोरोना कॅपिटल; शहराच्या अर्थचक्राला बसली खीळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:48 AM

कॉलसेंटर्सपासून आयटीपर्यंत आणि कॉर्पोरेट कार्यालयांपासून ते कारखान्यांत राबणाºया मजुरांपर्यंत लाखो मुंबईकरांचे रोजगार या काळात बुडाले.

मुंबई : ‘मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका’ पठ्ठे बापूरावांनी वर्णन केलेल्या महानगरीच्या या संपन्नतेला गेल्या १०० दिवसांत कोरोनाचे ग्रहण लागले आहे. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. लाखो हातांनी रोजगार गमावला, मुंबईची लाइफलाइन समजली जाणाऱ्या लोकल सेवेलाही ब्रेक लागल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. रुग्णसंख्येच्या दहशतीने मुंबईकरांची झोप उडाली. आर्थिक संकटाची रुंदावणारी दरी प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकवत आहे. असंख्य संकटे झेलत दुसºया दिवशी नव्या तडफेने पुन्हा धावणारे मुंबईकर घराघरांत बंदिस्त झाले. सर्वाधिक प्रकोप सोसणारी ही देशाची आर्थिक राजधानी आता ‘कोरोना कॅपिटल’ ठरली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. ३० जूनपर्यंत या आजाराने ४,५५६ रुग्णांचा बळी घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १०० दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर झाले आणि २४ तास जागणाºया या शहराने दिवसाही जीवघेणा शुकशुकाट अनुभवला. नाइटलाइफची स्वप्ने बघणाºया मुंबईत भरदिवसातले दैनंदिन व्यवहारही अवघड झाले. त्याचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसला.

भारताच्या अर्थव्यवस्थेत मुंबई शहराचा वाटा ६ टक्क्यांच्या आसपास आहे. देशातील १० टक्के रोजगार हेच शहर निर्माण करते. ३० टक्के आयकर, ६० टक्के कस्टम ड्युटी, २० टक्के सेंट्रल एक्साईज, ४० टक्के फॉरेन ट्रेड आणि सुमारे ४० हजार कोटींचा कॉर्पोरेट टॅक्स एकट्या मुंबईतून देशाला मिळतो. ही करवसुली ज्यातून होते त्या सर्व व्यवहारांनाच टाळे लागल्याने कर वसुलीला कात्री लागली आहे.

बांधकाम व्यवसाय, उद्योगधंदे, पर्यटन, हॉटेल, रिटेल, वाहन विक्री, मॉल मल्टिप्लेक्स, मनोरंजन, पायाभूत सुविधांची कामे अशा सर्वच आघाड्यांवर प्रगतीशील असलेले हे शहर लाखो हातांना काम देते. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक रोजगार क्षमता असलेल्या बांधकाम व्यवसायानेही अक्षरश: मान टाकली. गेल्या तीन महिन्यांत एकही नवा प्रकल्प येथे सुरू झाला नाही. ४० हजारांपेक्षा जास्त घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरातील पर्यटन उद्योगाची वार्षिक उलाढाल ६ लाख कोटींच्या घरात असून, संपूर्ण वर्षासाठी ती बुडाली आहे. दररोज १६ कोटींचे व्यवहार सेवा क्षेत्रात होतात. मात्र, तेसुद्धा ढेपाळले आहेत. बॉलिवूडचा वार्षिक टर्नओव्हर १ लाख ३०० कोटींचा आहे. त्याच्या भवितव्याबाबत अनिश्चितता आहे. शेअर बाजारापासून ते वडापाव विक्रेत्यांपर्यंत आणि बांधकाम मजुरापासून ते बॉलिवूडच्या तारेतारकांपर्यंत प्रत्येक घटकाला टाळेबंदीचे चटके सोसावे लागत आहेत. तोट्याचे आकडे बघून उद्योजक आणि व्यावसायिकांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.घराघरांतील अर्थचक्राला घरघरकॉलसेंटर्सपासून आयटीपर्यंत आणि कॉर्पोरेट कार्यालयांपासून ते कारखान्यांत राबणाºया मजुरांपर्यंत लाखो मुंबईकरांचे रोजगार या काळात बुडाले. अनेकांच्या वेतनात कपात झाली. त्यामुळे घराघरांतील अर्थचक्रालाही घरघर लागली आहे. कुणालाही उपाशी झोपू देत नाही ही मुंबईची ख्याती. मात्र, आज हातावर पोट असणाºया शेकडो कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. कोरोना नियंत्रणात येत नसल्याने अशी हजारो कुटुंबे अगतिक झाली आहेत.घडी पूर्वपदावर आणण्याचे आव्हानप्रत्येक व्यवसाय दुष्टचक्रात अडकला असून तो पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान मुंबईसमोर उभे ठाकले आहे. आर्थिक अरिष्टामुळे प्रत्येक जण काटकसरीवर भर देत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित उत्पादनांची मागणी रोडावली आहे. बाजारातील मंदी, कोरोना जोपर्यंत राजधानीतून हद्दपार होत नाही तोपर्यंत मुंबईचे अर्थचक्र रुळावर येणे अवघड दिसत आहे.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई