Join us  

Coronavirus : मुंबई, पुणे येथील कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता- अमित देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 4:40 AM

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णांची चाचणी करण्याकरिता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट आॅफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती. यानुसार, मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले की, मुंबईतील जे.जे. महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून, यालाही उद्याच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तिन्ही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच केंद्र उपलब्ध आहे.शासकीय रुग्णालयाच्या चाचणी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याबरोबरच, मुंबईतील सात खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीसाठी मान्यता देण्यासंदर्भातही वैद्यकीय शिक्षण विभागाने मागणी केली होती. पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एसआरएल डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज, नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे. या प्रयोगशाळांना कोरोना तपासणीसाठी तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. दररोज प्रत्येकी १०० नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच, या प्रयोगशाळांमधूनही कोरोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.लवकरच येथेही तपासणी केंद्रे सुरूलवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी नागपूर येथील तपासणी केंद्राची क्षमता दोनशे तर अन्य केंद्रांची क्षमता प्रत्येकी शंभर आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसअमित देशमुख