Join us  

Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक; मास्क नसल्यास होणार अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 4:07 PM

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई होणार आहे.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक, कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी  सार्वजनिक ठिकाणी  मास्क घालणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास संबंधिताला अटकही होऊ शकते, असा इशारा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी दिला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई होणार आहे.राज्यात लागू करण्यात आलेल्या 'साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७' नुसार 'महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२०' अन्वये महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेकात किमान अंतर ठेवण्यासोबतच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे त्यांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.या आदेशानुसार रस्ते, रुग्णालय, कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी शक्यतो तीन थरांचा किंवा चांगल्या पद्धतीने घरी बनवलेला स्वच्छ मास्क घालणे बंधनकारक आहे. वाहन चालवताना ड्राइव्हर आणि गाडीत बसलेल्या सर्वांनी मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क घातल्याशिवाय कुणीही बैठकांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बसू नये अथवा उपस्थित राहू नये, असे पालिकेने बजावले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस