Coronavirus : मुंबई-ठाण्यात ७५,००० खाटा तयार..!, मास्क वापरा, गर्दी टाळा, नाहीतर खाटा तुमची वाटच पाहत आहेत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 07:30 IST2021-12-28T07:29:49+5:302021-12-28T07:30:14+5:30
Coronavirus: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत.

Coronavirus : मुंबई-ठाण्यात ७५,००० खाटा तयार..!, मास्क वापरा, गर्दी टाळा, नाहीतर खाटा तुमची वाटच पाहत आहेत..!
स्नेहा मोरे / सुरेश लोखंडे
मुंबई, ठाणे : मास्क टाळा, गर्दी करू नका असे आवाहन जगभरातले सगळे तज्ज्ञ करत आहेत. पण मुंबई-ठाण्यात ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसत आहे, ते पाहता कोरोनाची तिसरी लाट दूर नसल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यात प्रशासनाने सरकारी व खासगी इस्पितळात मिळून ७५,००० खाटा तयार ठेवल्या आहेत. पण ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत, ते पाहता या खाटादेखील कमी पडतील अशी भीती तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
आज कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरीही वाढत्या रुग्णांचा विचार करून सरकारी आणि खासगी रुग्णालये व जम्बो कोविड सेंटर्समध्ये ५१,५०० रुग्णखाटांची तयारी ठेवण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सरकारी व खासगी २७४ कोरोना रुग्णालयात एकाचवेळी २४ हजार ३८ रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. मुंबईतही महापालिकेसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
या केंद्रांची तयारी
वांद्रे- कुर्ला संकुल, दहिसर, सोमय्या मैदान, कांजूरमार्ग, मालाड, कांदरपाडा येथील जम्बो केंद्रे बंद आहेत. मात्र ओमायक्रॉनचा धोका असल्यामुळे ही केंद्रे कोणत्याही क्षणी सुरू करता येतील, अशा स्थितीत आहेत.
सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा वाढविण्याची क्षमता
सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत. त्याचप्रमाणे, रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी डायलिसिस सेवा उपलब्ध आहे. रुग्णालयात १० स्वतंत्र डायलिसिस मशीन्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. येथे २० खाटा लहान रुग्णांसाठी आहेत. कामा रुग्णालयात १५० खाटा आहेत, जीटीमध्येही १६० खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयात खाटा वाढविण्याची क्षमता आहे; त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचाही विचार करून सेवा वाढविल्या जात आहेत. सध्या सेंट जॉर्जमध्ये २१ रुग्ण, जीटी रुग्णालयात एकही रुग्ण नाही तर कामा रुग्णालयात चार कोविड रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी दिली आहे.
तयार कोविड केंद्र आणि खाटांची क्षमता
बीकेसी २२००
भायखळा १०००
वरळी डोम ५५०
सेव्हन हिल १७५०
नेस्को फेज १- १७५०
मुलुंड १६५०
राखीव कोविड केंद्र आणि खाटांची क्षमता
दहिसर ७००
मालाड २२००
कांजूरमार्ग १८००
सोमय्या १५००
नेस्को फेज २ १५००
ठाणे जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा सज्ज
तिसरी लाट आलीच तर तिला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा तैनात केली आहे. सलग तीन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लांट, एलेमो प्लांट, जम्बो सिलिंडर, ड्यूरो सिलिंडर, आदींसह मोठे ऑक्सिजन टँकही उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात उपलब्ध सुविधा
बेड : १०,५८८
व्हेंटिलेटर बेड : १,०७६
आयसीयू बेड : ३,२१३
रुग्णालये : २७४
कोरोना हेल्थ सेंटर : ६८
खासगी रुग्णालयात ४ टक्के रुग्ण
खासगी रुग्णालयात ११ हजार ५०० खाटा तयार आहेत. त्यातील सध्या केवळ ४ टक्के खाटांवर रुग्ण आहेत. खासगी रुग्णालयात एकूण २२ हजार खाटांची क्षमता आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये १८ हजार खाटांची तर जम्बो कोविड केंद्रातही २२ हजार खाटांची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईत खाटांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घेतली असल्याचे खासगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी स्पष्ट केले.
पार्ट्या थांबवा, मास्क वापरा
“मी संलग्न असलेल्या रुग्णालयात रुग्ण भरती झाल्याने बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे पार्ट्या थांबवा, मास्क वापरा आणि लसीकरण करून घ्या. - हर्ष गोएंका, उद्योगपती
जादा खाटांचे व्यवस्थापन
रुग्णांच्या खाटा वगळता, लक्षणे नसलेल्यांसाठी ४० हजार खाटा, तर झोपडपट्टीत कोरोना नियमांचे पालन शक्य नसल्याने त्यांच्यासाठी ३० हजार खाटांची तयारी ठेवण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.