Join us  

CoronaVirus: बापरे! मुंबईत ४३ नवे कोरोनाबाधित सापडले, आता तरी काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 10:12 PM

शहर उपनगरातील २१२ विभाग महापालिका प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहेत.

मुंबई – राज्यभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असतानाच सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई शहर आणि उपनगरातील आहेत. त्यातही निकट संपर्कातून संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक आहे, या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील २१२ विभाग महापालिका प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहेत. शहर उपनगरात शुक्रवारी नव्या ४३ कोरोना बाधितांची नोंद झाली, आता मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या २७८ वर पोहोचली आहे. मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, आता तरी काळजी घेऊन सामाजित अंतर राखत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईतील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत २४ ते ३० मार्चदरम्यान १४ रुग्णांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचा निर्वाळा महापालिकेच्या आरोग्य खात्यानेही दिला आहे. दरम्यान, विविध रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णांवर पालिकेच्या आरोग्य चमूचेही लक्ष असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याखेरीज घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गुरुवारी मृत्युमुखी पडलेल्या ६२ वर्षीय रुग्णाला कफ, ताप आणि पोटदुखीचा त्रास होता. खासगी रुग्णालयात २४ मार्चला त्याचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले, त्याला शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयाने पुष्टी दिली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पालिकेच्या विविध रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात ९ हजार ३११ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर संशयित २ हजार ४२७ दाखल करण्यात आले.

३ एप्रिलची आकडेवारी

बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी आलेले रुग्ण            २०३

एकूण भरती झालेले संशयित रुग्ण                      १११

मुंबईतील पाॅझिटिव्ह रुग्ण                            ४३

एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण                              ९

घरी सोडलेले रुग्ण                                  १

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस