Join us  

Coronavirus : मुंबई महानगर प्रदेशातील २१ जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:58 AM

मुंबईत गुरुवारपर्यंत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी डी. विभाग येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात आतापर्यंत २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कस्तुरबा रुग्णालयात कोरोनासंबंधी केलेल्या चाचणीत तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी आढळून आले. यापैकी दोघे मुंबईतील असून, एक कल्याणमधील आहे, तर ११४ संशयित रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.मुंबईत गुरुवारपर्यंत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी डी. विभाग येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यू.के. वरून प्रवास करून १४ मार्च रोजी मुंबईत आलेल्या या व्यक्तीला १८ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह आणि कर्करोग असल्याने त्यांच्यावर किमोथेरिपी सुरू आहे. कोरोनाची लागण झालेली दुसरा व्यक्ती एफ उत्तर विभागातील रहिवासी असून, त्यांचे वय ३८ वर्षे आहे. तुर्की येथून आलेल्या या व्यक्तीला १८ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कोरोनाची लागण झालेले कल्याण येथील ५३ वर्षीय रहिवासी ४ मार्च रोजी दुबईवरून आले आहेत. मात्र, त्यांच्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांना गुरुवारी रुग्णालयात भरती करून चाचणी करण्यात आली.त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गेल्या १५ दिवसांत त्यांनी कुठे, कुठे प्रवास केला? या कालावधीत कोणत्या नातेवाइकांना ते भेटले याची माहिती घेण्यात येत आहे.आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्याचे दिसून आले आहे, तर उर्वरित रुग्ण त्यांचे नातेवाईक आहेत.अलगीकरण केलेल्या प्रवाशांची व्यवस्थाआंतरराष्ट्रीय प्रवास करून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. अशा प्रवाशांची संख्या अधिक असल्याने त्यांची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जात आहे. यासाठी मुंबईत तीनशे कि.मी. परिसरापर्यंत त्यांना नेण्याकरिता १५ ते २५ विना वातानुकूलित बसगाड्या तयार ठेवण्याची सूचना पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला केली आहे. मात्र, या प्रवाशांची संख्या कमी असून, त्यांच्या राहण्याचे ठिकाण तीनशे कि.मी.पेक्षा जास्त असल्यास त्यांना टॅक्सीने सोडण्यासाठी २० ते २५ टॅक्सी तयार ठेवण्यात येणार आहेत.खासगी रुग्णालयांमध्ये शंभर खाटांची व्यवस्थाकोरोनाग्रस्त रुग्णांसाठी पुढच्या आठवड्यापर्यंत करण्यात येणार आहे, तसेच वांद्रे भाभा आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात प्रत्येकी दहा आणि राजावाडी रुग्णालयात २० खाटा राखीव करण्यात आल्या आहेत. वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, तसेच राजावाडी येथे कोरोनाच्या तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई