Join us  

कोरोनाच्या भीतीतही डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 7:32 PM

२५ डॉक्टरांनी सुरू केले कम्युनिटी दवाखाना

मुंबई : सध्या सर्वत्र करोनाच्या साथी मुळे सगळेजण भीतीच्या छायेत वावरत आहेत. बहुतेक ठिकाणी खाजगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढत आहे. कोरोनाच्या भीतीतही लोकांना जवळच उपचार मिळावे यासाठी डॉक्टरांनी रमाबाई कॉलनी येथे मोफत कम्युनिटी दवाखाना सुरू केला आहे.

याबाबत बोलताना डॉ. विजय नाईक म्हणाले की, कोरोनाचा प्रसार  होऊ नये म्हणून खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे महापालिका दवाखान्यातील गर्दी वाढायला लागली. गर्दीमुळे कोरोनाचा लागण किंवा प्रसार होण्याचा धोका होता. तसेच रमाबाई कॉलोनी परिसरात बैठी चाळ आहे. दाटीवाटीने लोक राहतात एखादया व्यक्तीला लागण झाल्यास त्याचा प्रसार तीव्रतेने होईल.  त्यामुळे  डॉ. विपुल जोशी,  डॉ. दिलीप लोखंडे, डॉ. किरण कामत आम्ही सर्वांनी मिळून कम्युनिटी दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. घाटकोपर मेडिकल असोसिएशनच्या  रमाबाई कॉलनी व कामराज नगर , घाटकोपर पूर्व येथे व्यवसाय करणाऱ्या २५पेक्षा जास्त डॉक्टरांनी शहीद स्मारक समितीच्या सभागृहात कम्युनिटी ओपीडी चालू केली. २ एप्रिल पासून सरासरी दररोज तीनशे पेक्षा जास्त रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. येथे रुग्णांकडून कोणताही मोबदला न घेता त्यांची तपासणी करून औषधे दिली जातात.  सर्व डॉक्टर  ही सेवा सामाजिक बांधिलकी स्मरून विनामूल्य देत आहेत. 

या कामासाठी शहीद स्मारक समिती चे कार्यकर्ते स्वतःहून मदतीसाठी पुढे सरसावले. सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझेशन, गर्दीचे नियंत्रण याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.   ही समाज सेवा करत असताना काही कंपन्यांच्या मदतीने गोळ्या, मास्क, आदी वस्तू उपलब्ध करत आहोत. परंतु हा औषधे १५ एप्रिल पर्यंतची आहेत. त्यापुढे दवाखाना चालविण्यासाठी औषधांचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे नियमित ओपीडीसाठी लागणारी औषधे पुरविण्यासाठी सामाजिक संस्था किंवा औषध कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच या डॉक्टरांनाही पीपीइ किट मिळायला हवे असेही ते म्हणाले.

 

अपचनाच्या तक्रारी वाढल्या

 नियमितपणे ९० टक्के रुग्ण हे सर्दी तापाचे येत होते.  पूर्वी जेवल्यानंतर फेरफटका मारायला घराबाहेर पडत होते.  कोरोनामुळे आता सर्वजण घरात आहेत. त्यामुळे सर्दी,ताप खोकल्या पोटदुखी,अंगदुखी, अपचनाच्या तक्रारी वाढल्या  आहेत असे डॉ दिलीप लोखंडे यांनी सांगितले.

 

 डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

कम्युनिटी दवाखाना चालविण्यासाठी डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये डॉ. लक्ष्मण पाखले, डॉ सानिका नाईक, डॉ ज्योस्ना नलावडे, डॉ भरत सूर्यवंशी, डॉ काटकर ,डॉ शिरीष आनंदे, डॉ अजय जाधव, डॉ प्रमोद सोनवणे, डॉ करुणा सोनवणे, डॉ पल्लवी अहिरे,डॉ सुनीता पाटील,डॉ.अमोल पानसरे, डॉ संतोष गुप्ता, डॉ यशवंत मोरे पाटील, डॉ. पंचलिंग, डॉ.अर्चना अमोलिक, डॉ. भाविन संचारिया, डॉ.मनीषा पाटील  यांचा समावेश आहे. तसेच शहीद स्मारक समितीचे नामदेव उबाळे व त्यांचे कार्यकर्ते चिंतामण गांगुर्डे,आनंद शिंदे कर.काका गांगुर्डे, विनोद शिंदे, पद्माकर धेनक, संजय केदारे,राजा गांगुर्ड यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.

 

टॅग्स :आरोग्यकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस