Join us  

उद्यान प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात कोरोनाचे विघ्न; दरवर्षी भुरळ घालणारे प्रदर्शन यंदा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 7:53 PM

सन १९९६ पासून दरवर्षी महापालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे भव्य उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

मुंबई: पान - फुलांपासून साकारण्यात येणार उद्यान प्रदर्शन मुंबईकरांसाठी दरवर्षी आकर्षण ठरते. लाखो मुंबईकर या प्रदर्शनाला आवर्जून हजेरी लावतात. यंदा तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विशेष आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने जानेवारी -फेब्रुवारीमध्ये होणारे उद्यान प्रदर्शन यंदा रद्द करण्यात आले आहे.

सन १९९६ पासून दरवर्षी महापालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे भव्य उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे प्रदर्शन हे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० या दरम्यान भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला दरवर्षी लाखो मुंबईकर, देशातील विविध राज्यांतून येणारे पर्यटक हजेरी लावतात. गेल्या वर्षी तब्बल तीन लाख नागरिकांनी येथे हजेरी लावली होती. या प्रदर्शनाची तयारी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. 

यात शोभेच्या फुलांचे व भाज्यांचे बिया जमवणे, रोप तयार करणे, कुंड्या तयार करणे, फळझाडांची निगा राखणे अशी कामे असतात. त्याचबरोबर प्रतिकृतींसाठी लागणारे साहित्य, सांगाडे तयार करणे ही महत्वाची कामे करण्यात येतात. यासाठी सर्व २४ विभागातील एकण ४० ते ५० माळी-कामगार एकत्र मिळून काम करत असतात. मात्र अद्याप मुंबईत  ‘कोविड – १९’ या विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने खबरदारीची उपाययोजना वार्षिक उद्यान प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

या प्रदर्शनासाठी निमंत्रण पुस्तिका छापणे, प्रदर्शनाचे फलक तयार करणे, प्रदर्शनाच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी लागणारे साहित्य तयार करुन ते पालिकेच्या सर्व २४ विभागात पोहचविणे, मान्यवर मंडळींना आमंत्रित करणे या कामांकरिता प्रत्येक विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक व उद्यान विद्या सहाय्यक कार्यरत असतात. ही सर्व कामं ‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर पार पाडणे जोखमीचे ठरु शकते. म्हणूनच यंदा उद्यान प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. - जितेंद्र परदेशी (उद्यान अधिक्षक, महापालिका)

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई