Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार; एनजीओ विश्वास ‘मानवता की मिसाल’ कार्यक्रमात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 20:05 IST

‘मानवता की मिसाल’ विश्वास पुरस्कार २०२२ चे वितरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले.

मुंबई: गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाने देशाला मोठा तडाखा दिला. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. मात्र, या काळात शेकडो कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. या कोविड योद्ध्यांना ‘मानवता की मिसाल’ कार्यक्रमात गौरवण्यात आले. ‘मानवता की मिसाल’ विश्वास पुरस्कार २०२२ चे वितरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले.

या कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्याच्या भावनेने शहरातील अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली. यात ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान आणि रजनीश दुग्गल, गायिका मधुश्री, डिझायनर रोहित वर्मा, गौरी टोंक यांचा समावेश होता.  

निःस्वार्थ कोरोना योद्ध्यांनी आपल्या प्रियजनांपासून दूर राहून सर्वस्व अर्पण केलं. मानवतेच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी त्यांचे बलिदान अमूल्य राहिले आहे. आम्ही ज्या विशेष व्यक्तींचा सत्कार करत आहोत. त्यांनी महामारीच्या काळात अनुकरणीय धैर्य आणि दयाळूपणा दाखवला आहे. हे पुरस्कार म्हणजे आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचे एक छोटेसे पाऊल आहे, असे एनजीओ विश्वासचे संस्थापक सुरेश अग्रवाल यांनी सांगितले.  

अधिवक्ता अरुण केजरीवाल, कृष्णा महाडिक, डॉ. धीरज कुमार, सुश्री क्रिस्टीन स्वामीनाथन, डॉ. नदीम मोतलेकर, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. आकाश खोब्रागडे, डॉ. सचिन जगताप, डॉ. डी. कुमार, डॉ बाळकृष्ण अडसूळ , डॉ. रेणू बाळा राऊत, इकबाल ममदानी , श्री कृष्ण तुकाराम महाडिक, जय प्रकाश सिंग व अमित त्यागी यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पोलीस कर्मचारी अविनाश धर्माधिकारी, गौतम तुकाराम चौहान, शरद शिवाजी शिंदे, महेश महाजन, महेश मांडवे, कु. रेहाना शेख यांचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय, आरोग्यसेवा कर्मचारी  सुश्री उमा माहेश्वरी , कु. कल्पना अँड्र्यूज , कु. अनिता दत्तात्रय माळी, सु. उज्वला बापजी गोस्वामी, प्रशांत कांबळे यांच्यासह BMC स्वच्छता मदतनीसांच्या परिचारिकांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना जीनत अमान म्हणाल्या की, कोविड ही संपूर्ण मानवजातीसाठी एक भयानक परिस्थिती होती आणि हे खऱ्या जीवनातील नायकच खरे तारणहार ठरले. हे रिअल लाईफ हिरो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजाच्या सेवेला प्राधान्य देतात. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला सलाम! 

टॅग्स :मुंबई