Join us  

Corona Virus : राज्यातील शाळा कधी सुरू होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 5:54 PM

राज्य सरकारने कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांत राज्यातील हॉटेल चालक, रेस्टॉरंट यांना ५० टक्के क्षमतेने सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे

मुंबई - देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या 15 दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रविवार 9 जानेवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी लागू केलीली आहे. त्यानुसार, राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. राज्यातील शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांनाही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता, शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री टोपे यांनी विधान केलं आहे. 

राज्य सरकारने कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांत राज्यातील हॉटेल चालक, रेस्टॉरंट यांना ५० टक्के क्षमतेने सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. नागरिकांनी सर्व समाजाचे हित पाहून निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विशेषत: शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. आता, राज्यातील शाळा कधी सुरू होणार, याबाबत राजेश टोपेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.

लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. मात्र, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. पुढील 15 दिवसांच्या कालावधीतल कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

दारू दुकानादारांना दिला होता इशारा

दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट व इतर आस्थापनांमध्ये गर्दी झाली तर त्यावर बंदी आणली जाईल, असा इशाराही राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिला आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. भविष्यात रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर यापेक्षाही अधिक कडक निर्बंध लागू करावे लागतील, असेही टोपेंनी म्हटले होते.  

टॅग्स :राजेश टोपेशाळाकोरोना वायरस बातम्या