Join us

राज्यात चार जण निरीक्षणाखाली कोरोना विषाणू; १०५ जणांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 04:57 IST

कोरोना विषाणूसंबंधी (कोविड - १९) तपासणीसाठी राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या १०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूसंबंधी (कोविड - १९) तपासणीसाठी राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या १०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ४ जण रुग्णालयात दाखल असून, मुंबईत २ तर पुणे आणि नाशिक येथे प्रत्येकी १ जण भरती आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या ४९६ विमानांमधील ५९ हजार ६५४ प्रवासी तपासण्यात आले आहेत.केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशांतील प्रवाशांसोबतच इराण आणि इटली या देशांतील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून ३५९ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २३६ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने, राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ११३ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांच्याकडून देण्यात आला आहे. इतर दोघांचे अहवाल प्रलंबित असून लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टॅग्स :कोरोना