Join us

Corona Virus: साथीचा मुकाबला करूया; श्वसनविकारतज्ज्ञ अल्पा दलाल यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 04:32 IST

कोरोना हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्ससारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाºया विषाणूंच्या गटातील विषाणू आहे. यामुळे ताप, कोरडा खोकला आणि थकवा येतो.

मुंबई : जगात कोरोनाची साथ आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. या साथीचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज होऊया. देशात क्षयरोगामुळे रोज १४०० लोक दगावतात. पण त्याचे कुणाला काहीच वाटत नाही. कोरोनाने मात्र लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ज्ञ डॉ. अल्पा दलाल यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगताना डॉ. दलाल म्हणाल्या की, हा आजार टाळण्यासाठी लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. एखाद्या संशयित रुग्णापासून किमान तीन मीटर दूर राहणे, दिवसातून काही वेळ सूर्यप्रकाशात वावरणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, यामुळे कोरोनाची धार कमी करता येऊ शकते. याखेरीज, कोरोनासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अशा पोस्ट्स, मेसेज शेअर करताना त्याची विश्वासार्हता पडताळा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कोरोना हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्ससारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाºया विषाणूंच्या गटातील विषाणू आहे. यामुळे ताप, कोरडा खोकला आणि थकवा येतो. काही रुग्णांमध्ये सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे अशी लक्षणे आढळतात. याचबरोबर ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वत:हून बरे होतात. १५ टक्के रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि एक ते दोन टक्के रुग्ण यात दगावतात. गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचे रुग्ण यांच्यामध्ये दिसून येतो. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत आघाडीवर आहे. मधुमेहामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पण, मधुमेहाकडेच दुर्लक्ष केले जाते. आपली जीवनशैली बदलणे, किमान सात तास झोप यामुळेदेखील रोगप्रतिबंधक शक्ती वाढविता येते. आहार, व्यायाम हे सुदृढ राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना