Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी लस विकतच; मुंबई महापालिका आयुक्तांनी जाहीर केला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:25 IST

खासगी केंद्रांतच होणार लसीकरण : मुंबई महापालिका आयुक्तांनी जाहीर केला निर्णय

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मेपासून सुरुवात होत आहे. मात्र मुंबईत राज्य शासन आणि महापालिकेच्या ६३ केंद्रांवर यापुढे केवळ ४४ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच लस देण्यात येईल, असा निर्णय मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी जाहीर केला आहे. यामुळे मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लोकांना मोफत लस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

१ मेपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या पूर्वतयारीबाबत आयुक्तांनी ऑनलाईन आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच आरोग्य विभागातील सर्व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

गर्दी टाळण्यासाठी विभाजन

मुंबईत १८ ते ४४ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी दोन डोस याप्रमाणे सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे लस उपलब्ध करून घेण्यासाठी पालिकेकडून सरकार व लस उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर पालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल. तरी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी सांगितले.

लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ

सध्या १३६ लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्यात शासन आणि महापालिकेचे मिळून ६३ केंद्र आहेत, उर्वरित ७३ खासगी रुग्णालयातील केंद्र आहेत. आणखी २६ खासगी रुग्णालयांकडून मान्यतेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या ९९ वर पोहोचणार आहे. लस उत्पादक कंपन्यांशी पालिका प्रशासन संपर्कात आहे. लस साठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान १ लाख नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई महानगरपालिका