Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : लसींचा साठा मिळाला, मुंबईत  ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार, शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:46 IST

Corona vaccination Update : मुंबईतील शासकीय व महापालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे नियमित लसीकरण होणार आहे. 

मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या एक लाख लसींचा साठा मुंबईला मिळणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील शासकीय व महापालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे नियमित लसीकरण होणार आहे. 

लसींचा साठा मिळत नसल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. सोमवारी मर्यादित लसी मिळाल्यानंतर महापालिकेने मंगळवारी पाच केंद्रावर प्रत्येकी ५०० लसी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात आल्या. तर काही निवडक शासकीय आणि पालिका केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. परंतु, मंगळवारी रात्री उशिरा महापालिकेला एक लाख डोस मिळत असल्याने बुधवारी दुपारी लस मिळू शकणार आहे.

यांना मिळणार लस - ४५ वर्षांवरील पहिली व दुसरी अशी दोन्ही मात्रा (डोस) पात्र नागरिकांना देण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना कोविन ऍपमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. तर दुसरी मात्रा घेण्यासाठी थेट येणाऱ्या नागरिकांनाही लस देण्यात येईल. 

- पहिली व दुसरी अशा दोन्ही मात्रांसाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना ८० टक्के नोंदणीकृत तर २० टक्के थेट येणारे नागरिक असे विभाजन करण्यात आले आहे.

- १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना निर्देशित पाच केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेले आहे, त्यांनाच मिळणार आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई