Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: तिसरी लाट ज्येष्ठांच्या मुळावर; मृतांमध्ये सर्वाधिक संख्या, पालिकेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 07:58 IST

मुंबईत १ ते १६ जानेवारीदरम्यान कोरोना मृत्युंपैकी ८९ टक्के लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ११ टक्के मृत्यू ४० ते ६० वयोगटातील होते.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असणाऱ्याचे सर्वाधिक बळी गेले. त्यानंतर तिसऱ्या लाटेत लहानग्यांना संसर्ग अधिक होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, तिसऱ्या कोरोनाच्या लाटेतही सर्वाधिक कोरोना बळींमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत १ ते १६ जानेवारीदरम्यान कोरोना मृत्युंपैकी ८९ टक्के लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ११ टक्के मृत्यू ४० ते ६० वयोगटातील होते.गेल्या १६ दिवसांत शहरात कोविडमुळे ८० जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ७१ ज्येष्ठ नागरिक होते, तर उर्वरित ४० ते ६० वयोगटातील होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले की, यापैकी बहुतेक मृत्यूंत श्वसनासंबंधी आजारांचा समावेश होता, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पालिकेच्या मृत्यूच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, संपूर्ण कोरोना महामारीच्या साथीत ज्येष्ठ नागरिक हा सर्वात अतिजोखमीचा गट आहे. राज्य कोविड मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोनाची सुरुवात झाल्यापासून शहरात झालेल्या मृत्यूंपैकी बहुतेकांना सहव्याधी होत्या किंवा उपचारास उशीर झाला होता.सध्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी, कोविडमुळे होणारे मृत्यू आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शिवाय, गेल्या दोन दिवसापासून मुंबईतील कोविड मृत्यू दोन अंकी झाला आहे, ही चिंतेची बाब आहे, असे राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. ओमायक्रॉनसह डेल्टाचा प्रभावही कायममुंबई : राज्यातील बहुतांश जणांना अजूनही मोठ्या प्रमाणात डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग होत असल्याचे जीनोम सिक्वेन्सिंगमधून समोर आले आहे. ही माहिती स्वतः आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.

पत्रातील उल्लेखानुसार राज्यात घेण्यात आलेल्या ४२०० हून अधिक नमुन्यांपैकी ६८ टक्क्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे, तर ३२% रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले. महाराष्ट्रात आतापर्यंत १७३८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर आदी भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी कोरोना लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. मात्र तरीही कोविड संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मागील १ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४२६५ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील ४२०१ नमुन्यांचे चाचणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात २,६५,३४६ रुग्ण उपचाराधीन असून, त्यातील ९० टक्के रुग्ण घरी विलगीकरणात आहेत किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या