Join us

Corona Vaccination: कोविड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र; BMC ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 20:24 IST

मुंबईसह भारतात कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-१९ लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे

ठळक मुद्देलसीकरण कार्यक्रमात आतापर्यंत पर्यंत ६९ लाख २६ हजार २५५ लाभार्थ्‍यांना मिळाला पहिला डोसब्रेक द चेन या अंतर्गत नव्‍याने सुधारीत तत्‍वे प्रसारीत करण्‍यात आलेली आहेत.कोविडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ञांनी वर्तवली आहे

मुंबई : कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर, शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस.कोणालाही दिला जाणार नाही.

मुंबईसह भारतात कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-१९ लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्‍ये आज (दिनांक १ सप्टेंबर २०२१) पर्यंत ६९ लाख २६ हजार २५५ लाभार्थ्‍यांना पहिली मात्रा (डोस) तर २५ लाख १७ हजार ६१३ लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आलेली आहे. या आकडेवारीवरुन असे निदर्शनास येते की, पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्‍यांचे प्रमाण कमी आहे.

तसेच, ब्रेक द चेन या अंतर्गत नव्‍याने सुधारीत तत्‍वे प्रसारीत करण्‍यात आलेली आहेत. त्यात सार्वजनिक निर्बंध शिथिल होऊन विविध आस्‍थापना सुरु झालेल्या आहेत. दोन्ही डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांना उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देखील देण्‍यात आलेली आहे. सद्यस्थितीत, कोविड-१९ या आजाराची रुग्‍णसंख्‍या काहीशी वाढत आहे. तसेच, कोविडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ञांनी वर्तवली आहे.‍ या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीचा दुसरा डोस (कोविशिल्‍ड असल्यास पहिल्या डोस नंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सीन असल्यास पहिल्या डोस नंतर २८ दिवस पूर्ण झाल्‍यास) घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने, मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक लसीकरण केंद्रावर, शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित केले आहेत. म्हणजेच, या दिवशी शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही. सबब, दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी सदर सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येत आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई महानगरपालिका