Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसीसाठी मुंबईकरांची ‘दमछाक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 02:42 IST

साठा वाढवा, मगच नोंदणी करून घ्या -नागरिक

मुंबई  : ॲप किंवा साइटच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी मुंबईकर रजिस्ट्रेशन करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात लस घेण्यास गेल्यावर लस मिळत नसल्याने विनाकारण दमछाक होत असल्याने ‘आधी लसींचा साठा वाढवा आणि मगच रजिस्ट्रेशन स्वीकार करा’ असा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे. मुंबईतील बऱ्याच खासगी कार्यालयात वय ४५ वर्षे असलेल्यांना कोरोनाची लस घ्या; अन्यथा कोविडचा निगेटिव्ह अहवाल सादर करा, असे एकीकडे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांना सांगितले जातेय. त्यामुळे लस मिळविण्यासाठी नागरिक रजिस्ट्रेशन करत आहेत. पण, प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात लसींचा साठा संपल्याचे सांगण्यात येत आहे. मालाडमध्ये राहणारे प्रसाद के. यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ऑफिसकडून अंधेरीत खासगी रुग्णालयात लस घेण्यासाठी गुरुवारची अपॉइंटमेंट त्यांच्यासह चौघांना मिळाली. अंधेरीत चकरा मारून नागरिक हैराणगुरुवारी सकाळी ९ ते ११ दरम्यानची वेळ त्यांना देण्यात आली. त्यानुसार सकाळी नऊच्या सुमारास ते अंधेरीत लस घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा पहिल्यांदा त्यांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत, परत बारा वाजता या, असे सांगून पाठविण्यात आले. त्यानंतर पुन्हा बाराच्या सुमारास ते पोहोचले, तेव्हा लस संपली, असे उत्तर मिळाले. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास त्यांना आणि त्यांचे सहकारी एस. भोसले यांना कोविडची पहिली लस देण्यात आली. कोरोनाची भीती आधीच लोकांमध्ये आहे, त्यातच लस घेण्यासाठी  रुग्णालयात कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

टॅग्स :कोरोनाची लस