Join us  

मोठी बातमी : ...त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यात होणार नाही कोरोना लसीकरण

By बाळकृष्ण परब | Published: January 16, 2021 10:09 PM

Corona vaccination Update : आजपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत.

ठळक मुद्देरविवारी मुंबई आणि राज्यात होणारे कोरोनाविरोधातील लसीकरण राहणार बंद कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आले आहेकोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अ‍ॅप डाऊन झाले आहे

मुंबई - मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मुंबई आणि राज्यात होणारे कोरोनाविरोधातील लसीकरण बंद राहणार आहे. तसेच सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अ‍ॅप डाऊन झाले आहे. तसेच लसीकरणाच्या ऑफलाइन नोंदणीस सध्या मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागली आहे. दरम्यान, आज सकाळी लसीकरणाला सुरुवात झाल्यावर रत्नागिरीमध्ये को-विन अ‍ॅपबाबत अशी समस्या दिसून आली होती. कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी दाखल झालेल्या कोविशील्ड लसीचा पहिला डोस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाला ऑनलाईन सुरुवात केली. तर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे- कुर्ला संकुलातील केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाला. लसीकरणासाठी पाचशे प्रशिक्षित पथके पालिकेने तैनात ठेवली आहेत. दररोज ५० हजार लोकांना लस देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मुंबईत एकाचवेळी एक कोटी दोन लाख लस साठवणुकीची क्षमता आहे. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवूणक क्षमता असून दररोज ५० हजार लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर टप्पा दोनमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार पुढेही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईआरोग्य