Join us  

कोरोना : पश्चिम उपनगरात तीन वॉर्डने पार केला १० हजारांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 5:54 PM

पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने टाळेबंदी शिथील केल्यानंतर आता नागरिकांची रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.त्यामुळे पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र असून येथील पालिकेच्या के पूर्व,पी उत्तर व आर मध्य या तीन वॉर्डने आतापर्यंत कोरोना रुग्णांचा 10000चा आकडा पार केला आहे.तर के पश्चिम वॉर्ड मध्ये दि,13 रोजी कोरोनाचे एकूण रुग्ण 9812 होते.

विलेपार्ले (पूर्व), अंधेरी (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या तीन भागांचा मिळून सुमारे साडे दहा लाख लोकसंख्येचा के पूर्व वॉर्ड आहे.पालिका प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार के पूर्व वॉर्ड मध्ये  दि,6 रोजी एकूण कोरोनाचे 9310 रुग्ण होते,दि,13 रोजी 10027 एकूण रुग्ण आहेत.या सात दिवसात एकूण 717 कोरोना रुग्णांची वाढ झाली.आतापर्यंत 7941 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुंबईतील सर्वात जास्त 562 मृत्यू या वॉर्ड मध्ये झाले आहे.सध्या या वॉर्ड मध्ये 1524 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 65 दिवसांवर गेला आहे.

मालाड पूर्व व मालाड पश्चिम मिळून सुमारे 10 लाख लोकसंख्येचा पी उत्तर वॉर्ड आहे.या वॉर्डमध्ये दि,6 रोजी 9249 एकूण कोरोना रुग्ण होते,दि,13 रोजी कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10079 झाली.या सात दिवसात या वॉर्ड मध्ये 730 कोरोना रुग्णांची वाढ झाली.आतापर्यंत 8298 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून उपचारा दरम्यान 375 रुग्णांचा मृत्यू झाला.सध्या या वॉर्ड मध्ये 1524 रुग्णांवर उपचार सुरू असून  वाढीचा दुपटीचा दर 56 दिवसांवर गेला आहे.

बोरिवली पूर्व व बोरिवली पश्चिम हे विभाग आर मध्य वॉर्डमध्ये येतात.या वॉर्डने सुद्धा कोरोना रुग्णांचा 10000 चा टप्पा पार केला असून दि,13 पर्यंत या वॉर्ड मध्ये आतापर्यंत 10223 कोरोना रुग्ण होते.दि,6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत या वॉर्डमध्ये 1118 कोरोना रुग्णांची वाढ झाली.तर आतापर्यंत 7873 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचारा दरम्यान 311 रुग्णांचा मृत्यू झाला.आता या वॉर्ड मध्ये दि,13 पर्यंत 2039 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर रुग्ण बरे होण्याचा दुपटीचा दर 42 दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिकालॉकडाऊन अनलॉक